नगर : कोर्टाच्या स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य | पुढारी

नगर : कोर्टाच्या स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे नव्याने झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीतील स्वच्छतागृहात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी येणार्‍या प्रत्येक नागरिकाने इमारतीतील स्वच्छता राखावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिर्डे यांनी केले आहे.

उर्किर्डे म्हणाले की, कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने संगमनेर जवळील घुलेवाडी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची सुंदर इमारत उभी केली आहे. या देखण्या इमारतीतून न्यायदानाचे काम होत आहे. मात्र, येथे कामानिमित्त येणार्‍या काही नागरिकांना गलिच्छ सवयी असल्याने त्यांनी या न्याय मंदिराच्या इमारतीत असणार्‍या स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाण केली आहे. त्याचा त्रास येथे येणार्‍या प्रत्येक नागरिकाला होत आहे.

स्वच्छतागृहात असणार्‍या वॉश बेसिनमध्ये पाण्याच्या रिकाम्या बाटल्या दिसून येतात. स्वच्छतागृहातील भिंती तंबाखू, पान, गुटख्याच्या पिचकारीने रंगून गेलेल्या आहेत. वॉश बेसिंगमध्येही तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसत आहे.

अपंगांसाठी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात अशीच परिस्थिती आहे. सार्वजनिक मालमत्तेची काळजी व रक्षण करणे जसे प्रशासनाचे काम आहे, तसेच काम प्रत्येक नागरिकांचे असल्याचे सांगून सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व त्याची स्वच्छता राखण्याचे काम प्रत्येक सामान्य नागरिकांचे आहे. या इमारतीला जपण्याचा व तिची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, अशी विनंती केली आहे.

Back to top button