संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील प्राचीनकालीन असणार्या अहिल्याबाई होळकर बारवेवरील अतिक्रमण प्रशासनाच्या आदेशाने काढले आहे. मात्र, अजून उर्वरित राहिलेले इतर अतिक्रमण काढण्याचे आदेश नाशिकच्या पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका आरती काळे यांनी समनापूर ग्रामपंचायत आणि महसूल प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रशासन आता राहिलेले अतिक्रमण कधी काढणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
समनापुरात प्राचीनकालीन अहिल्याबाई होळकर बारवेवर गावातील राजू रोकडे यांनी बांधकाम विभागाची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केले होते. त्यामुळे अहिल्याबाई होळकर विचार मंचचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी ग्रामविकास अधिकार्यांना घेरावो घातला होता, तसेच महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक कार्यालयाकडे सुद्धा तक्रार केली होती.
महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुरातन वास्तुशास्त्र अवशेष अधिनियम 1960 अन्वये प्रांतधिकार्यांच्या आदेशानुसार बारवेवरचे अतिक्रमण पाडण्यात आले होते. मात्र, त्यावेळी वरवरचे बांधकाम काढले. मात्र, पूर्व आणि पश्चिमेकडील दोन्ही भिंती त्यांनी पाडल्या नसल्यामुळे अतिक्रमण पूर्णपणे पाडले असे होत नाही, तसेच ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करत नसल्याने विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका काळे यांच्या देवा शेरमाळे आणि शिवाजी शेरमाळे यांनी निदर्शनास आणून दिले होते. ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने सदरचे बांधकाम लवकरात लवकर काढून टाकून बारवेला चारही बाजूंनी ठरावीक अंतर सोडून बारवेचे सौंदर्य जपावे, असे सक्त आदेश आरती काळे यांनी लेखी पत्राद्वारे समनापूर ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहेत.