नगर : धोकादायक इमारती जमीनदोस्त | पुढारी

नगर : धोकादायक इमारती जमीनदोस्त

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिका बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाने शहरातील धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आज माळीवाडा व चौपाटी कारंजा येथील धोकादायक इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या. संबंधित इमारतीचे मालक व भाडेकरूंना वारंवार सूचना देऊनही ते स्वतः इमारती उतरून घेत नव्हते. त्यामुळे महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे व त्यांच्या पथकाने ठोस मोहीम हाती घेत आजपासून धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात केली.

महापालिकेच्या हद्दीत गेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या काही इमारती धोकादायक स्थिती आजही उभ्या आहेत. त्या धोकादायक इमारतीपासून जीवितास धोका असल्याने त्या इमारती पाडण्याची कारवाई करावी, यासंबंधी मनपाच्या बांधकाम विभागाकडे आतापर्यंत 162 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील 28 इमारती आतापर्यंत निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यात अजूनही काही इमारती धोकादायक स्थिती उभ्या आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच त्या धोकादायक इमारती उरविणे आवश्यक होते.

त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून धोकादायक इतारतींची माहिती संकलित केली आहे. मनपातर्फे धोकादायक इमारतीची नावे जाहीर निवेदनाद्वारे प्रसिद्ध करून रहिवाशांना इमारती उतरवून घेण्याबाबत आवाहन केले होते. धोकादायक इमारतीचे मूलमालक अथवा भाडेकरून वारंवार नोटिसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे मनपा बांधकाम विभागाने शहरात सुमारे 15 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले. आजपासून त्या इमारती पाडण्याची मोहीम सुरू केली.

सकाळी दहा वाजता माळीवाडा येथील पडोळे यांची जुनी इमारत महापालिकेच्या पथकाने पाडली. तर, दुपारी चौपाटी कारंजा येथील ब्राह्मण समाजाची मोडकळीस आलेली इमारत पथकाने जमीनदोस्त केली. आणखी 13 इमारती पाडण्यात येणार आहेत.
ही कारवाई महापालिकेच्या शहर अभियंता सुरेश इथापे, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, बांधकाम विभागाचे अमोल लहारे, अशोक बिडवे, जिरवान शेख, अर्जुन जाधव, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, इलेक्ट्रिक विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशमन विभागाचे सुरेश मिसाळ, व पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

पंधरा वर्षांतील खमकी कारवाई
महापालिकेने गेल्या पंधरा वर्षात धोकादायक इमारती पाडण्याची इतकी मोठी मोहीम हाती घेतली नव्हती. आता शहरातील सुमारे पंधरा धोकादायक इमारती पाडण्यात येणार आहेत. त्यातील तीन इमारती आज उतरविण्यात आल्या. उद्या भापळेगल्ली, झारेकर गल्ली, टांगेगल्ली, झारेकर गल्ली, आडते बाजार, दाळमंडई कोपरा, हॉटेल राजेंद्र मंगलगेट, तेलीखुंट, तपकीर गल्ली, माणकेश्वर गल्ली, माळीवाडा, डांगे गल्ली, माणिक चौक आदी भागातील इमारती पाडण्यात येणार आहेत.

शहरातील 15 धोकादायक इमारतीपैकी तीन इमारती जेसीबी व अन्य साधनाच्या साह्याने आज उतरविण्यात आल्या. उद्यापासून ही मोहीम आणखी व्यापक करण्यात येणार आहे.
– सुरेश इथापे, शहर अभियंता

भाडेकरूंनी इमारत सोडावी
शहरातील अनेक धोकादायक इमारतीत मूळमालक राहत नाही. मूळमालक दुसर्‍या शहरासह परदेशात स्थलांतरित झालेले आहेत. त्या इमारतीत भाडेकरू राहत आहेत. वारंवार सूचना देऊनही भाडेकरू इमारत सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे उद्या पोलिस बंदोबस्तात भाडेकरूना बाहेर काढून इमारत पाडण्यात येईल. त्यासाठीची सर्व कायदेशीर पुर्तता केलेली आहे.

Back to top button