नगर : पळशी अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे शिक्षा | पुढारी

नगर : पळशी अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे शिक्षा

नगर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील पळशी येथील एका सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणार्‍या आरोपी पोपट शंकर साळवे याला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी साळवे याने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शेतात निर्जन ठिकाणी नेऊन दि. 8 ऑक्टोबर 2016 रोजी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेमुळे ग्रामस्थांनी पारनेर बंदची हाक दिली होती. त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून दोषी व्यक्तीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नेमणूक करण्यासंबंधी शासन पातळीवर पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने शासनाने अ‍ॅड. यादव-पाटील यांची या प्रकरणात नियुक्ती केली होती. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले होते.

न्यायालयाने आरोपी पोपट शंकर साळवे याला दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व 15 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तत्कालीन उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उमेशश्चंद्र यादव-पाटील यांनी काम पाहिले.

Back to top button