

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरामध्ये बिबट्याने थैमान घातले आहे. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसणार्या बिबट्याचे दर्शन काही चारचाकी वाहन चालकांना झाले. रात्रीच्या वेळी राहुरी ते बारागाव नांदूर रस्त्यावर वॉच ठेवणार्या बिबट्यामुळे 'सहाच्या आत घरात' अशी अवस्था शेतकर्यांची झाली आहे. तीन दिवसातच तब्बल पाच शेळ्यांचा फडशा पाडणार्या तीन बिबट्यांना पिंजर्यात कैद करण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बारागाव नांदूा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, डिग्रस, मोमीन आखाडा परिसरातील ऊस क्षेत्र झपाट्याने कमी झाली. कारखान्यांच गाळप हंगाम संपल्यानंतर शेतकर्यांचे शेती क्षेत्र मोकळे पडले. परिणामी ऊस क्षेत्र कमी झाल्याने बिबट्यांना लपण्यासाठी मोक्याची जागा राहिली नाही. बिबट्यांनी आता मानवी वस्त्यांकडे आगेकूच सुरू केली आहे. गावातील काही मानवी वस्त्यांवर बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. सायंकाळी 6 वाजेच्यानंतर बिबट्या केव्हाही वस्त्यावर दाखल होऊन जनावरांचा फडशा पाडत आहे.
गावातील ग्रामपंचायत सदस्य खतीबभाई देशमुख यांच्या वस्तीवर बिबट्याने सायंकाळी 6 वाजताच दर्शन देत गोठ्यातील बोकड्याचा फडशा पाडला. त्यासह गावातील देवकर वस्ती येथेही बिबट्याने धुमाकूळ घालत हरीभाऊ देवकर व बाबासाहेब देवकर यांच्या शेळी व बोकड्याचा फडशा पाडला. बोरटेक रस्त्यावरील गाडे-गोपाळे वस्ती येथेही बिबट्याने धुमाकूळ घालत विलास गाडे, शौकतभाई देशमुख यांच्या शेळीचा फडशा बिबट्याने पाडला. तर गावठाण हद्दीमध्ये आलेल्या बिबट्याने शंकर बाचकर यांच्या शेळीची शिकार केली.
सेवा संस्थेचे संचालक बंडू गाडे यांच्या वस्तीवर बिबट्याने दर्शन देत सुरेश ढेरे यांच्या बोकड्याची शिकार केली.
बारागाव नांदूर, डिग्रस, मोमीन आखाडा हद्दीमध्ये तीन बिबट्यांचा संचार असल्याची चर्चा आहे. बारागाव नांदूर येथील हॉटेल व्यावसायिक आरीफ देशमुख हे चारचाकी वाहनातून घराकडे येत असताना बिबट्या रस्त्याच्या लगत एका फ्लेक्सचा आसरा घेऊन बसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ते चित्र मोबाईल मध्ये टिपले. बिबट्याचा राहुरी ते बारागाव नांदूर रस्त्याला असणारा वॉच प्रवाशांना धडकी भरणारा ठरला आहे.