नगर : कोळगाव येथे दोन गटांत सशस्त्र हाणामारी | पुढारी

नगर : कोळगाव येथे दोन गटांत सशस्त्र हाणामारी

शेवगाव तालुका : वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने लोखंडी कोयत्याने वार केल्याने पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील आरोपीला पोलिस पकडून घेऊन जात असताना दुसर्‍या गटातील एकाने हल्ला केल्यामुळे पोलिस कर्मचार्‍याची दोन बोटे तुटल्याची घटना कोळगाव (ता. शेवगाव) येथेे रविवारी 3 रोजी रात्री उशिरा घडली.

या प्रकरणी अण्णा तुकाराम खंडागळे (वय 55, राहणार कोळगाव, ता. शेवगाव) याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, तर पोलिसास जखमी केल्याप्रकरणी अर्जुन विठ्ठल खंडागळे (वय 48) व ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय 20, दोघेही रा. कोळगाव, ता. शेवगाव) यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात तणावाचे वातावरण

घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. जखमी पोलिस संदीप उबाळे यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला, तर पाच जणांना नगर येथे हलविण्यात आले आहे. याबाबत लक्ष्मी थोरात यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, जुन्या भांडणाच्या कारणावरून अण्णा खंडागळे याने वडील भगवान दशरथ खंडागळे, आई पार्वती भगवान खंडागळे यांना शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने डोक्यावर, हातावर वार केले. दोघांनी आरडाओरड केल्याने नातेवाईक सुनील संतोष हिवाळे, मारिया सुनील शेवाळे मी धावत आले असता आमच्यावरही त्याने कोयत्याने वार केले.

या हल्ल्यात आई, वडील, नातेवाईक गंभीर जखमी झाले, तर मलाही गंभीर मार लागला. या अगोदरही अण्णा खंडागळे याने अनेक वेळा आई-वडिलांना मारहाण करून दहशत केल्याचे म्हटले आहे. थोरात यांच्या फिर्यादीवरून अण्णा खंडागळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत. जखमींना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिस कर्मचारी परशुराम नाकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोळगाव येथे दोन गटांमध्ये तुंबळ हाणारी झाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विलास पुजारीं यांना मिळाली. त्यांनी त्वरित सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मी व सहकारी संदीप उबाळे दोघेजण आरोपी अण्णा खंडागळे यास पकडून गाडीकडे घेऊन जात होतो. त्याच वेळेस अर्जुन विठ्ठल खंडागळे याने त्याला सोडा मी त्याला जीवे ठार मारणार आहे. असे म्हणत त्याच्याकडील कोयत्याने अण्णा खंडागळे याच्यावर वार केला. मात्र, तो त्याला न लागता पोलिस संदीप उबाळे यांच्या हाताच्या बोटावर लागला. यामध्ये त्यांची दोन बोटे तुटली असून, ते गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी आरोपी अर्जुन खंडागळे यास कोयत्यासह, तर ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय 20) व अण्णा खंडागळे यांस पोलिसांनी ताब्यात घेतले. नाकाडे यांच्या फिर्यादीवरून अर्जुन खंडागळे व ज्ञानेश्वर खंडागळे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके तपास करीत आहेत.

Back to top button