नगर : ‘भूमीअभिलेख’चा अवघ्या आठ जणांंवर भार! | पुढारी

नगर : ‘भूमीअभिलेख’चा अवघ्या आठ जणांंवर भार!

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणार्‍या कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये महत्त्वाचे असणारे उपाधीक्षक पदासह तब्बल 22 पैकी 14 पदे रिक्त आहेत. सध्या अवघ्या आठ कर्मचार्‍यांवर हे कार्यालय काम करत आहे.

शेतकरी व नागरिक यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय कर्जत येथे अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय या ठिकाणी होत आहे. महत्त्वाचे असणारे उपअधीक्षक पद हे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे या कार्यालयामध्ये कामकाजाचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे या ठिकाणी अनेक नोंदी ह्या गैरमार्गाने होत असल्याचे गंभीर प्रकार दिसून येत आहेत. वास्तविक पाहता शेतजमीन किंवा इतर जमिनींच्या नोंदी करताना शासनाच्या सर्व नियमांचे पालन होण्याची आवश्यकता असताना या ठिकाणी इतर मार्गाने नोंदी होत असल्याच्या घटना या धक्कादायक घडत आहेत. आणि याला कारण प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त आहे.

लाचलुचपतच्या कारवाईने प्रश्न

या कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यामुळे या कार्यालयातील कामकाज कशा पद्धतीने चालत आहे, याचा दुसरा पुरावा या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही. अशा गंभीर घटना घडूनही या कार्यालयाबाबत संबंधित विभागाचे आयुक्त तसेच जिल्हा अधीक्षक यांचे होत असलेले दुर्लक्ष कोड्यात टाकणारे आहे. यामुळे या कार्यालयाबाबत आता थेट मंत्रालय स्तरावरून हालचाली होण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येते. वेळेत याबाबत निर्णय झाले नाही तर याची गंभीर परिणाम शेतकरी आणि नागरिकांना भोगावे लागणार आहेत.

सध्या येथे उपअधीक्षक पदावर श्रीगोंदा येथील गोसावी यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. ते देखील आठवड्यातून एक दिवस किंवा फार तर दोन दिवस या कार्यालयामध्ये येत आहेत. मात्र तालुक्यातील क्षेत्रफळ आणि या ठिकाणी असलेल्या कामाचा व्याप पाहता पूर्णवेळ अधिकार्‍याची तातडीने गरज येथे आहे. त्याचप्रमाणे कार्यालयातील मुख्य सहाय्यक शिरस्तेदार अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. अनेक पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागतात, यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. शिवाय गैरमार्गाने काम करण्यासाठी याचा उपयोग करून घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

रिक्त पदे खालील प्रमाणे

  • उपअधीक्षक : 1
  • मुख्यालय सहाय्यक : 1
  • शिरस्तेदार : 1
  • भूकरमापक : 2
  • कनिष्ठ लिपिक : 1
  • छाननी लिपिक : 1
  • आवक जावक : 1
  • दुरुस्ती लिपिक : 1
  • दप्तर बंद : 1
  • शिपाई : 3

Back to top button