नगरः धोकादायक इमारतींवर आज हातोडा, मनपाकडून पोलिस बंदोबस्तात होणार कारवाई | पुढारी

नगरः धोकादायक इमारतींवर आज हातोडा, मनपाकडून पोलिस बंदोबस्तात होणार कारवाई

नगरः शहरातील अनेक धोकादायक इमारती असल्याच्या तक्रारी मनपाकडे आल्या असून, त्यातील 15 इमारती  मनपातर्फे उतरवून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संपूर्ण तयारी केली आहे.

नगर शहरात गेल्या अनेक वर्षांच्या मोडकळीस आलेल्या 30 इमारती असून, त्या इमारती परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक आहेत. शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या इमारती आहेत. त्या इमारतींपासून नागरिकांना धोका आहे. शहरात आजपर्यंत 162 धोकादायक इमारतीबाबत तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत 28 इमारती उतरविण्यात आल्या आहेत. तर, काही इमारतींची प्रक्रिया न्यायालयीन स्तरावर प्रलंबित आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच त्या धोकादायक इमारती उतरविणे आवश्यक होते. त्या इमारतींपासून अपघात होऊ जीवितहानी नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून धोकादायक इतारतींची माहिती संकलित करण्यात आली. महापालिकेतर्फे धोकादायक इमारती असलेल्या नागरिकांना जाहीर निवेदनाद्वारे इमारती पाडून घेण्याबाबत आवाहन केले होते. मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये मूळ मालक राहत असल्यास त्यास उतरवून घेण्यासाठी महापालिकेच्या परवानगी गरज नाही.

दरम्यान, धोकदायक इमारतीचे मूलमालक अथवा भाडेकरून धोकादायक इमारती उतरवून घेण्याकडे टाळाटाळ करीत आहेत. वारंवार जाहीर निवेदनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मनपाने स्वतः होऊन इमारती उतरवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 15 इमारतींची निवड करण्यात आली आहे. कारण त्या अत्यंत धोकादायक असून, जोराच्या पावसाळ्यात त्या इमारती कोसळू शकतात. त्यामुळे परिसरातील इमारतींही धोका होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे शक्य होईल तेवढ्या इमारती पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघांच्या वादाचा तिसर्‍याला त्रास
शहरातील अनेक धोकादायक इमारतीत मूळमालक राहत नाही. मूलमालक दुसर्‍या शहरासह परदेशात स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे भाडेकरू इमारत सोडण्यास तयार नाहीत. त्या दोघांचा वाद न्यायालयात सुरू आहे. त्यात मूळमालक परदेशात अलिशान बंगल्यात राहत आहेत. मात्र, त्यांच्या धोकादायक इमारतीमुळे नगरमधील सामान्य माणसाचा जीव धोक्यात आला आहे.

धोकादायक इमारती या भागात…
भापळेगल्ली, माळीवाडा, झारेकर गल्ली, टांगेगल्ली, झारेकर गल्ली, आडते बाजार, दाळमंडई कोपरा, हॉटेल राजेंद्र मंगलगेट, तेलीखुंट, तपकीर गल्ली, चौपाटी कारंजा, माणकेश्वर गल्ली, माळीवाडा, डांगे गल्ली, माणिक चौक

धोकादायक इमारती उतरवून घेण्याबाबत घर मालकांना वारंवार नोटिसा व जाहीर निवेदनही प्रसिद्ध केले आहे. तरी मूळमालक इमारत उतरवून घेत नसल्याने उद्या शहरातील धोकादायक इमारती उतरविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
– सुरेश इथापे,
शहर अभियंता

Back to top button