‘काळे’ उसाला पहिला हफ्ता 2500 रुपये देणार : आ. आशुतोष काळे

‘काळे’ उसाला पहिला हफ्ता 2500 रुपये देणार : आ. आशुतोष काळे
Published on
Updated on

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  मागील तीन गळीत हंगामापासून जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवून 2022-23 च्या गळीत हंगामात गाळपाला येणार्‍या ऊसाला पहिला हफ्ता 2 हजार 500 रुपये देणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 या वर्षाच्या 68 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक, मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.

याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आ. आशुतोष काळे बोलत होते. यावेळी आ. काळे म्हणाले की, चालू हंगामात देशामध्ये 410 लाख मे. टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करून त्यापैकी इथेनॉल उत्पादनासाठी 45 लाख टन साखरेचा वापर होऊन साखरेचे निव्वळ उत्पादन 365 लाख मे.टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात एकूण 14.87 लाख हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध असून मागील हंगामात 137 लाख मे. टन साखर उत्पादन झाले असून चालू हंगामात देखील 138 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल, असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. मात्र मागील तीन महिने ऊस पिकाच्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषणाचे ऊसाच्या मुळाचे कार्य मंदावले आहे. अति पाऊस होऊन देखील उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही.

कार्यक्षेत्रात जास्त प्रमाणात असलेल्या को -265 या उसावर इतर ऊस जातीच्या तुलनेत जास्त प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मंत्री समितीने 15 ऑक्टोबर पासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वत्र पडणारा पाऊस, दिवाळी सण त्यामुळे ऊस तोडणी कामगार उपलब्ध झाले नाही आदी कारणांमुळे आजमितिला 40 ते 50 साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले आहेत. परतीच्या पावसाने सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले असून ऊस पिकांचे नुकसान झालेले दिसत नसले तरी टनेज घटण्याचा अंदाज आहे.

शेतात आजही पाणी असल्यामुळे ऊसाने भरलेली वाहने शेतातून बाहेर काढणे अवघड आहे. त्यामुळे हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी ऊस शेतात पाणी असल्यामुळे उसामध्ये साखर कमी राहिल व त्याचा विपरीत परिणाम साखर उतार्‍यावर होणार आहे. सुरुवातीला साखर उतारा कमी राहील. त्यामुळे जिल्हा बँकेकडून पेमेंटसाठी मिळणारे ड्रॉवल कमी राहतील. या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन येणार्‍या प्रत्येक अडचणीवर मात करून हंगाम यशस्वी करू.

जागतिक स्तरावर साखर उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर हे दबावाखाली आहेत. गेल्या वर्षी ब्राझीलचे साखर उत्पादन घटल्यामुळे भारतीय साखरेला मोठा फायदा झाला. परंतु चालू हंगामात भारत व ब्राझील या दोन मोठ्या साखर उत्पादक देशांमध्ये साखर उत्पादनात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून चालू हंगामात ब्राझीलचे साखर उत्पादन वाढणार आहे.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सूर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांसह सभासद, शेतकरी, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news