

नगर : पुढारी वृत्तसेवा : गावठी कट्टा व दोन काडतूस विकण्यास आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी बसस्थानक परिसरात पकडलेे. हे दोघेही सराईत असून, त्यांच्याकडून 31 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नवनाथ साहेबराव गोर्डे (वय 34, रा. पोहेगाव, ता. कोपरगाव) व समाधान बाबासाहेब चव्हाण (वय 25, रा. कोपरगाव बेट, ता. कोपरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. राहुरी बसस्थानक परिसरात दोघे गावठी कट्टा विकण्यास येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. राहुरी बसस्थानक परिसरात संशयावरून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, गावठी कट्टा व दोन काडतुसे मिळाली. गावठी कट्टा कोणाला विकण्यास आणला, याचा तपास पोलिस करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे सोपान गोरे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, विजय ठोंबरे, सागर ससाणे आदींच्या पथकाने ही करवाई केली. हवालदार येमुल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही सराईत गुन्हेगार आरोपी नवनाथ गोर्डे याच्याविरुद्ध कोपरगाव, शिर्डी, लोणी पोलिस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, आर्म अॅक्ट असे गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपी समाधान चव्हाण याच्याविरूद्ध कोपरगाव पोलिस ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत.