नगर : शिक्षक बँक निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न | पुढारी

नगर : शिक्षक बँक निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न

नगर : पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बहुजन शिक्षक संघाने पुढाकार घेतला असून, इतर सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांशी बैठक घेण्यात आली. सभासदांच्या हितासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्यास, बँकेची प्रतिष्ठा राज्यभर वाढेल. तसेच, निवडणुकीत होणारा खर्च टाळला जाईल. याचबरोबर समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा मलीन होणार नाही, असे बहुजन शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर म्हणाले.

या बैठकीस मोहोळकर यांच्यासह गुरुमाऊली तांबे गटाचे दत्ता कुलट, गुरुकुल मंडळाचे संजय धामणे, रा. या. औटी, गुरुमाऊली रोहकले गटाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, बहुजन मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, स्वराज्य मंडळाचे नाना गाढवे, सदिच्छा मंडळाचे बाबा आव्हाड, ऐक्य मंडळाचे राजेंद्र निमसे, प्राथमिक शिक्षक संघाचे आबा जगताप, रघुनाथ झावरे, परिवर्तन मंडळाचे राजेंद्र विधाते, एल. पी. नरसाळे, विजय काकडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहुजन मंडळाचा एकही जागा न घेण्याचा निर्णय

बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभासदांच्या हितासाठी जर बँक बिनविरोध होत असेल तर, आम्ही निवडणूक रिंगणातून बाहेर जाऊ, असे उत्तरेश्वर मोहोळकर म्हणाले. यावेळी गुरुमाऊली (तांबे गट) मंडळाचे प्रतिनिधी दत्ता कुलट यांनी निवडणूक बिनविरोध होत असेल तर आमच्या मंडळाला एकही जागा नको, असे जाहीर केले. गुरुमाऊली (रोहाकले गट) मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनीही या प्रस्तावास पाठिंबा दर्शवित आमच्या मंडळाला एकही जागा नको, असे जाहीर केले. बहुजन मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे यांनीही निवडणूक बिनविरोध होत असेल तर आमचे मंडळ एकही जागा घेणार नाही, असे जाहीर केले.

प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट) राज्य सरचिटणीस आबा जगताप व रघुनाथ झावरे यांनीही प्रस्तावास पाठिंबा दर्शवित आमच्या मंडळाला एकही जागा नको, असे जाहीर केले. साजिर मंडळाचे प्रमुख विजय काकडे यांनी या प्रस्तावास पाठिंबा दर्शवित आमच्या मंडळाला एकही जागा नको, असे जाहीर केले.

शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व गुरुकुल मंडळाचे प्रतिनिधी संजय धामणे यांनीही या प्रस्तावास पाठिंबा दर्शवित, आमच्या मंडळास सभासद संख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे, असे मत मांडले. समितीचेच राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी यांनी हा प्रस्ताव खरोखरच शिक्षक हिताचा असून, तो सत्यात उतरविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. सदिच्छा मंडळाचे प्रतिनिधी बाबा आव्हाड यांनी या प्रस्तावास पाठिंबा दर्शवित आमच्या मंडळास सभासद संख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे, असे मत मांडले.

स्वराज्य मंडळाचे प्रतिनिधी नाना गाढवे यांनी या प्रस्तावास पाठिंबा देत मंडळास प्रतिनिधित्व मिळावे, असे मत मांडले. ऐक्य मंडळाचे प्रमुख राजेंद्र निमसे यांनी या प्रस्तावास बिनशर्त पाठिंबा देऊन आमच्या मंडळास प्रतिनिधित्व मिळावे असे मत मांडले. परिवर्तन मंडळाचे प्रमुख राजेंद्र विधाते यांनी या प्रस्तावास पाठिंबा देऊन आमच्या मंडळास प्रतिनिधित्व मिळावे, असे मत मांडले. एकल मंडळाचे प्रमुख एल. पी. नरसाळे यांनी या प्रस्तावास बिनशर्त पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

उमेदवार, सभासदांसाठी लिंक

इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष मोहळकर यांनी सभासद हित व समाजातील शिक्षकांची प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्वांनी या निवडणुकीमध्ये एकमेकांची बदनामी न करण्याचे आवाहन केले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फॉर्म भरलेल्या उमेदवारांसाठी एक व सभासदांसाठी एक गुगल लिंक तयार करून सर्वांची मते आजमावली जातील असे सांगितले. लवकरच परत एकदा बसून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

Back to top button