नगर : गर्भगिरी रांगांना गर्द हिरवाईचा साज; पर्यटकांमध्ये उल्हासाचे वातावरण | पुढारी

नगर : गर्भगिरी रांगांना गर्द हिरवाईचा साज; पर्यटकांमध्ये उल्हासाचे वातावरण

नगर तालुका : शशिकांत पवार : नगर तालुक्यात गर्भगिरीच्या डोंगररांगा मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या आहेत. सर्वदूर झालेल्या कमी-अधिक पावसाने तालुक्यातील वन विभागाच्या सुमारे साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावर हिरवळ पसरली आहे. पर्यटकांना विविध ठिकाणे आकर्षित करीत असून, पर्यटकांमध्ये उल्लासाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यातील चार मंडळांमध्ये वनविभागाचे सुमारे साडेसात हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील 750 हेक्टर क्षेत्र आर्मीचे (डेअरी फार्म) आहे. जेऊर मंडळ दोन हजार 200 हेक्टर क्षेत्र असून, त्यातील 500 हेक्टर क्षेत्र आर्मीचे आहे. कौडगाव मंडळात एक हजार 130 हेक्टर वन क्षेत्र असून, यातील 240 हेक्टर क्षेत्र आर्मीचे आहे. गुंडेगाव मंडळात एक हजार 900 हेक्टर क्षेत्र, तर नगर मंडळात दोन हजार हेक्टर वन विभागाचे क्षेत्र आहे.

वनविभागाच्या क्षेत्रात बहुतेक क्षेत्र हे डोंगरदार्‍यांनी व्यापलेले असल्याने पावसाळ्यात येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करत असते. चारही मंडळांत पावसाने हजेरी लावल्याने डोंगरदर्‍या हिरव्या गार झाल्या आहेत. खडकावरून खळाळणारे पाणी… मोरांच्या केकावण्याचा आवाज इतर पशुपक्ष्यांची किलबिल मध्येच पळणारा हरणांचा कळप, असे विहंगम दृश्य गर्भगिरीच्या डोंगररांगांनी दिसू लागले आहे. डोंगरातील झाडी, गवत हिरवेगार झाल्याने डोंगराने हिरवा शालू परिधान केला असल्याचे चित्र भासत आहे.

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे परिसरातील वन्य प्राणी, तसेच विविध पशुपक्षी याच परिसरातून स्थलांतरित झाले होते. आता तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगा हिरव्यागार, तसेच पाण्याचा खळखळाट झाल्याने पोषक वातावरण बनले आहे. त्यामुळे वन्य प्राणी व पशुपक्षी परत आपल्या अधिवासात परतत आहे. तालुक्यातील वनक्षेत्रात हरीण, काळवीट, चिंकारा, तरस, कोल्हा, लांडगा, खोकड, साळींदर, ससा, मोर याबरोबरच विविध जातींच्या पक्ष्यांचा मुक्त संचार आढळतो. अनेक भागांत बिबट्याचे वास्तव्य देखील आढळून येत आहे. तालुक्यात जेऊर, बहिरवाडी, आगडगाव, देवगाव, गुंडेगाव परिसरात गर्भगिरीच्या मोठ्या प्रमाणात डोंगररांगा आहेत. येथील अनेक नैसर्गिक ठिकाणे हे महाबळेश्वरची आठवण करून देतात. तालुक्यातील या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक ही गर्दी करत आहेत.

जंगल, वन्यप्राण्यांची काळजी घ्या

इमामपूर परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. परंतु पर्यटक, गुराखी, तसेच नागरिकांनी जंगलातील झाडांची हानी होणार नाही, तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी. जंगल, वन्यप्राणी हे सृष्टी चक्र सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहेत. त्यादृष्टीने पर्यटकांनी जंगल व वन्य प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे यांनी सांगितले.

डोंगरगण, इमामपूर परिसराचे आकर्षण

डोंगरगण, गोरक्षनाथ गडावरील निसर्ग अप्रतिम आहे. डोंगरगण येथील हॅप्पी व्हॅली, धबधबा, तसेच गोरक्षनाथगडावरून दिसणारे निसर्गाचे विविध कलाविष्कार ही पर्यटकांना भुरळ घालत आहेत. इमामपूर येथील श्री क्षेत्र खिरणीचा महादेव या परिसरातील निसर्गाचे विहंगम दृश्य हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. ससेवाडी येथील पवित्र सीना नदीच्या उगमस्थानावरील सीना शंकर मंदिर, बहिरवाडी परिसर, कोल्हार घाट, आगडगाव, इमामपूर घाट या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

गर्भगिरीच्या डोंगररांगा हिरव्यागार झाल्याने निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा. परंतु झाडी व वन्यप्राण्यांची काळजी घ्यावी.

– सुवर्णा माने, उपवनसंक्षक, नगर.

Back to top button