सरकारी मदतीची आस; 45 शेतकर्‍यांचे गळफास, 38 प्रस्ताव फेरचौकशीच्या फेर्‍यात | पुढारी

सरकारी मदतीची आस; 45 शेतकर्‍यांचे गळफास, 38 प्रस्ताव फेरचौकशीच्या फेर्‍यात

दीपक ओहोळ : 
नगर: कोरोनाचा फेरा, कर्जाचा भार आणि मातीत घातलेल्या पैशांइतकेही उत्पन्न शेतीतून न मिळाल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या जिल्ह्यातील 45 शेतकर्‍यांनी यंदाच्या वर्षी आतापर्यंत इहलोकी अखेरचा श्वास घेतला. मात्र, आत्महत्येनंतरही या शेतकर्‍यांची सरकारकडून उपेक्षाच झाली. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या केवळ 6 कुटुंबियांना शासनाकडून मदतीचा हात मिळाला. उर्वरित 38 शेतकरी कुटुंबिय सरकारी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत.

जानेवारी ते जून या सहा महिन्यांत जिल्ह्यातील 45 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली. कर्जबाजारीपणा, नापिकी, शेतमालाला बाजार भाव नाही, अशा विविध कारणांमुळे बळीराजा नेहमीच संकटात असतो. कर्जबाजारीपणा किंवा नापिकीला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे सिध्द झाल्यास, संबंधित शेतकर्‍यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची सरकारी मदत दिली जाते. आतापर्यंत 6 सहा जणांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली आहे. एक प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आला असून, उर्वरित 38 प्रकरणांची फेरचौकशी सुरू आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. पाऊस चांगला आणि नक्षत्रानुसार पडला तर खरीप पिके हाती लागतात. सरासरीपेक्षा कमी वा अधिक झाल्यास शेतकर्‍यांच्या हाती पिके लागत नाहीत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपीट हे पाचवीला पुजलेले आहेत. त्यामुळे या नैसर्गिक हानीमुळे खरीप व रब्बी उभ्या पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

त्यामुळे शेतकरी मानसिक आणि आर्थिकदृष्टया खचला जात आहे. अनेक शेतकरी पिकांच्या भरवशावर ट्रॅक्टर व इतर शेतीपयोगी साधनांसाठी बँकांकडून घेतात. परंतु कधी पावसाअभावी तर कधी अतिवृष्टीमुळे पिके हाती लागत नाहीत. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत जातो. पिके हाती लागली तर त्याला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

जिल्ह्यात 1 हजार 29 आत्महत्या
2003 ते जून 2022 या कालावधीत जिल्ह्यातील 1 हजार 29 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यापैकी 505 शेतकर्‍यांनीच कर्जबाजारी व नापिकीमुळे आत्महत्या केल्याचे सिध्द झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने दिली. 486 शेतकर्‍यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले. 38 जणांच्या प्रस्तावांची फेरचौकशी सुरु आहे.

एप्रिल, मे मध्ये सर्वाधिक
जानेवारी महिन्यात 8, फेब्रुवारी महिन्यात 7, मार्चमध्ये 4, एप्रिल महिन्यात 11, मे महिन्यात 11 व जून महिन्यात 4 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी महिन्यातील चार व फेब्रुवारी महिन्यातील 2 अशा सहा शेतकर्‍यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.

Back to top button