नगर : शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरणार, संभाजी ब्रिगेडचा तीव्र आंदोलनाचा इशारा | पुढारी

नगर : शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरणार, संभाजी ब्रिगेडचा तीव्र आंदोलनाचा इशारा

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर-औरंगाबाद महामार्ग लगत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन मुळे अनेक शेतकरी व व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत दै. पुढारीने वृत्त प्रसिद्ध करून वास्तव समोर आणले आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड संघटना खंबीरपणे उभे राहणार असून, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले.

नगर-औरंगाबाद महामार्गालगत सीएनजी गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. सदर काम हे सर्व नियम, अटी धाब्यावर बसवून सुरू आहे. कामात सावळागोंधळ सुरू असून, शेतकरी व व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे. शेकडो झाडांची कत्तल, विद्युत लाईनची शिफ्टिंग, शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात चर, व्यावसायिकांसमोर चर खोदून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे.

शेतकर्‍यांची मोठमोठी फळझाडेही तोडण्यात आली असून, ठेकेदाराकडून गलथान कारभार सुरू आहे. पाईपलाईनचे काम करताना वाहने महामार्गावर मधोमध लावणे, माती, मुरूम रस्त्यावर टाकणे, एकेरी वाहतूक करणे या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडलेले आहेत. अपघातात अनेक तरुणांचे बळी गेले, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत शेतकरी, व्यावसायिक यांनी तीव्र विरोध केला. परंतु, संबंधित ठेकेदाराच्या मनमानीपुढे शेतकरी हतबल झाले होते.

प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय पुढार्‍यांनी याबाबत तोंडावर बोट ठेवल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. प्रशासनाला सांगून देखील काहीही कारवाई होत नाही. महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालताना दिसून येत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामागचे गौडबंगाल काय, हे शेतकर्‍यांना चांगलेच समजले आहे. संबंधित कंपनीला तात्काळ परवानगी देणारे हेच अधिकारी शेतकर्‍यांच्या कामाबाबत नेहमीच उदासीन असतात.

संभाजी ब्रिगेड संघटना आता या शेतकर्‍यांच्या तसेच व्यावसायिक व अपघातग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी दिली. शेतकर्‍यांसमवेत संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दळवी यांनी दिला आहे. संबंधित कंपनीला काम करण्यासाठी कोणते निकष लावून परवानगी देण्यात आली व कोणत्या अधिकार्‍यांनी दिली, त्यांची चौकशी करून कारवाई करावी. संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांसाठी जेलमध्येही जाऊ
नुकसानगखस्त शेतकरी, व्यावसायिक, तसेच अपघातात बळी गेलेल्या कुटुंबीयांना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मदत मिळवून देणार आहे. संबंधित कंपनीने तात्काळ मदत न दिल्यास त्यांची वाहने, मशिनरी, जेसीबी, पोकलेन ताब्यात घेऊन शेतकर्‍यांच्या ताब्यात देऊ. शेतकर्‍यांसाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी आढळणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असे दळवी यांनी सांगितले.

‘दैनिक पुढारी’वर कौतुकाचा वर्षाव
गॅस पाईपलाईनच्या सावळ्या गोंधळाविरोधात दै. पुढारीने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून वास्तव परिस्थिती समोर मांडली. दै. पुढारीने नेहमीच नुकसानग्रस्त शेतकरी, व्यावसायिक व अपघातग्रस्तांना न्याय देण्यासाठी वास्तविक परिस्थितीचे वृत्तांकन करून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे जेऊर पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिकांनी दै. पुढारीचे कौतुक केले आहे.

Back to top button