राहुरीत अत्याचार, चोर्‍यांसह लुटमारीचे थैमान, सेवानिवृत्त शिक्षकाचे 2 लाख पळविले | पुढारी

राहुरीत अत्याचार, चोर्‍यांसह लुटमारीचे थैमान, सेवानिवृत्त शिक्षकाचे 2 लाख पळविले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :राहुरीत चोरी, घरफोडी, दुकानफोडी, अत्याचार, विनयभंग, अपहरण या गुन्हेगारीच्या घटनांनी थैमान घातले असताना, भरदिवसा बाजारपेठेतून सेवानिवृत्त शिक्षकाची 2 लाख रूपयांची बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली. यापूर्वी शहरातील बसस्थानक लगत परिसरातून बोलेरो चारचाकी व बाजार समितीच्या आवारातून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुन्हेगार किमया साधत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

राहुरी परिसरात झोपी गेलेल्या गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. ग्रामीण भागामध्ये अवैध धंदे, मटका, जुगार यांसह गावठी दारू विक्रीचा धंदा जोमात सुरू झाला असताना, चोरी, दरोडेखोरांसह वाहन चोरीच्या घटनांनी सर्वसामान्यांवर दहशत निर्माण केली आहे. अत्याचार, विनयभंग, अपहरण यासह अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.

शनिवारी सकाळच्या सत्रामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रसमोर 2 लाख रूपयांची चोरी झाल्याची घटना घडली. राहुरीतील विद्या मंदिर प्रशालेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दगडू शंकर मिस्तरी हे सकाळी 11.30 च्या सुमारास बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी पाळत ठेवली. शिक्षक पैसे घेऊन बँकेतून बाहेर येत असताना दोघांपैकी एकाने 10 व 20 रूपयांच्या एकूण 90 रूपयांची रक्कम खाली टाकली. ‘तुमचे पैसे खाली पडले’ असे त्यांना सांगण्यात आले.

आपलेच पैसे पडल्याचे समजून गुरुजींनी हातातील पैशाची बॅग दुचाकीला अडकविली. ते पैसे उचलत असतानाच दुचाकीला लावलेली पैशाची बॅग दोघा भामट्यांनी काढून घेत पळ काढला. भरबाजारपेठेत चोरी झाल्याची माहिती समजताच मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी उपस्थिती देत चोरीची माहिती घेतली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली. यामध्ये दोघे जण दुचाकीला अडकविलेले पैसे चोरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिस प्रशासन चोरट्यांचा तपास लावतील, अशी अपेक्षा लागलेली आहे.

दुसरीकडे राहुरी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शुक्रवारी रात्री बसस्थानक आवारातून एका बोलेरो चारचाकी वाहनाची चोरी झाल्याची घटना घडली. तक्रार देण्यााठी गेलेल्या संबंधित इसमाला कागदपत्राच्या फेर्‍यात अडकवित पोलिसांकडून उलटतपासणी करण्यात आली. त्यामुळे चारचाकी चोरीबाबत अजूनही तक्रार दाखल नसल्याचे समजले आहे. एकूणच अत्याचार व चोर्‍या होत असल्याने शहर व तालुक्यात दहशत पसरली आहे.

तडजोडीबाबत पोलिस प्रशासन अनभिज्ञ
दुचाकी चोरीला गेल्यानंतर अनेकजण राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावाची वाट धरतात. पूर्वी दुचाकी चोरल्यानंतर चोरटे बारागाव नांदूर परिसरातील मुळा धरण व वन विभाग हद्दीमध्ये वाहने लपवून ठेवत असत. सद्यस्थितीला वाहन चोरीच्या घटना वाढल्याने अनेकजण बारागाव नांदूर गावाकडे चोरी गेलेली दुचाकी शोधण्यासाठी दाखल होत आहेत. काहींना तडजोडी करून दुचाकी सोडवून न्यावी लागते. परंतु, पोलिस प्रशासन याबाबत अनभिज्ञ राहत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिस उपअधीक्षक मिटकेंचा फक्त फेरफटका
श्रीरामपूर पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके हे कर्तव्यदक्ष असल्याचे बोलले जाते. परंतु, राहुरीत अनेक गुन्हेगारीच्या घडत असताना त्यांनीही केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. राहुरीत केवळ फेरफटका मारणारे पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी राहुरीच्या गुन्हेगारीकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.

Back to top button