नगर : शहरातील पथदिव्यांच्या वीज मिटरमधून चोरी | पुढारी

नगर : शहरातील पथदिव्यांच्या वीज मिटरमधून चोरी

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पथदिव्यांसाठी शहरात सुमारे दोनशे ते अडीशे वीजमिटर आहेत. त्या वीज मिटरमधून चोरी करून वीज वापर असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित कंपनी त्या चोरीचा शोध घेत आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. महापालिकेच्या हद्दीत सुमारे 32 हजार स्मार्ट एलएडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.

आणखी काही पथदिव्यांची आवश्यकता आहे. मात्र, पथदिव्यांच्या वीजबिलाचा मोठा भार मनपाच्या तिजोरीवर पडत होता आणि दुसरीकडे सर्व प्रभागात दिवे लावण्याची मागणी होती. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला काम देऊन ‘पथदिवे बसवा आणि वीज बिलही वसूल करून तुम्हीच घ्या’ या तत्त्वावर पथदिवे बसविण्यास दिले.

संबंधित ठेकेदाराने मनपा हद्दीत आतापर्यंत सुमारे 33 हजार पथदिवे बसविले आहेत. अजूनही काही पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पथदिव्यांसाठी मनपाचे शहर हद्दीत सुमारे 250 वीजमिटर आहेत. पथदिवे बसूनही मनपाचे पथदिव्यांचे वीजबिल कमी होत नव्हते. त्यामुळे नेमके वीजबिल कशामुळे जास्त येते याचा शोध घेतला असता मनपाच्या वीजमिटरमधून प्रोफेसर कॉलनी, अमरधाम व्यापारी संकुल परिसरात वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार संबंधित कंपनीने पथक नेमूण वीज चोरी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, गेल्या दोन महिन्यात अद्यापपर्यंत वीजचोरी सापडलेली नाही. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्वच 250 वीजमिटर बदलण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच वीज मिटर बदलण्यात येणार आहेत. दरम्यान, पावसाळ्यात अनेक ठिकाणी पथदिवे अचानक बंद होतात. त्याचा आढावा नुकताच आयुक्तांनी घेतला आहे.

Back to top button