राहुरी : कोरोनाचा दणका ; चिमुकले चालती मराठी शाळांची वाट | पुढारी

राहुरी : कोरोनाचा दणका ; चिमुकले चालती मराठी शाळांची वाट

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षांमध्ये कोरोनाने जगात थैमान घालत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. परंतु, हाच कोरोना शासकीय शाळांसाठी लाभदायी ठरला आहे. राहुरीतील जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दु शाळेमध्ये प्रवेश घेणार्‍या लहानग्यांची संख्या दहा टक्याने वाढल्याचे सुखद चित्र आहे. शासकीय शाळेमध्ये दारोदार भटकंती करणार्‍या शासकीय शिक्षकांना वाढलेल्या पटसंख्येचा बुस्टर डोस लाभला असल्याचे दिसत आहे.

राहुरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या व नगरपरिषदेच्या शासकीय शाळांची संख्या 260 इतकी आहे. तर खाजगी शाळांची संख्या 100 इतकी आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी शासकीय शाळांमधील पटसंख्या घटल्याने अनेक शिक्षकांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या होत्या. काही शाळांमध्ये तर केवळ 2 ते 3 विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

आपल्या मुलाने इंग्रजीमध्ये बोलावे, राहणीमान सुधारावे. शालेय उपक्रमांमध्ये सहभाग घेत आत्मविश्वास वाढवावा, अशी धारणा घेत पालकांनी इंग्रजी शाळांकडे आपला मोर्चा नेला होता. त्यामुळे इंग्रजी शाळांना मोठ्या प्रमाणात डोनेशनचे टॉनिक लाभत होते. 30 जूनपर्यंतची माहिती गटशिक्षणाधिकारी गारूडगर यांच्याकडून प्राप्त झाली आहे. त्यामध्ये चालू वर्षी मागील वर्षापेक्षा इंग्रजी शाळेचा पट घसरला असताना दुसरीकडे शासकीय शाळेचा पट मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.

सन 2021 मध्ये जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात 13 हजार 355 विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यामध्ये चालू वर्षी शासकीय शाळेच्या प्रवेशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सन 2022 रोजी जून महिना अखेरीपर्यंत पटसंख्या 14 हजार 358 इतकी वाढली आहे. सुमारे हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश शासकीय शाळेत वाढल्याचे दिसून आले.

तर दुसरीकडे इंग्रजी शाळेची पटसंख्या घसरत असल्याची आकडेवारी आहे. मागील सन 2021 मध्ये इयत्ता पहिले ते चौथी या वर्गात एकूण 3 हजार 990 इतके विद्यार्थी शिक्षण घेत होते. दरवर्षी इंग्रजी शाळेचा वाढत चाललेल्या आकड्याला चालू वर्षी ब्रेक लागल्याचे दिसत आहे. सन 2022 मध्ये इंग्रजी शाळेतील प्रवेशाची संख्येत घट होऊन 3 हजार 840 इतके विद्यार्थी इंग्रजी शिक्षण घेत आहेत.शासकीय शाळेमध्ये सेमी इंग्रजीचे नविन अभ्यासक्रम सुरू केल्याचा लाभ होत असतानाच कोरोनाचा बुस्टर डोस जिल्हा परिषदेच्या शाळांना लाभल्याचे दिसत आहे.

खासगी शाळांमध्ये दरवर्षी प्रवेश शुल्काच्या नावाखाली लूट केली जाते. त्या तुलनेत शासकीय शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क घेतले जात नाही. त्याउलट शासकीय शाळांमध्ये शासकीय योजनांचा लाभ तसेच शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा घेतल्या जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे खासगी शाळेतील लुटीपेक्षा शासकीय शाळेतील शिक्षणच मुलांसाठी लाभदायी असल्याचे सुखद चित्र दिसत आहे.

पटसंख्येतील वाढीसाठी प्रयत्नशील : गारूडकर
शासकीय शाळांची पटसंख्या वाढ तर इंग्रजी शाळांची पटसंख्या घटली. हे शासकीय शाळेतील शिक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे. काही वर्षांपूर्वी पटसंख्या अभावी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. परंतु, कोरोना कालखंडानंतर चित्र बदलले आहे. शासकीय शाळांमध्ये पटसंख्येत वाढ सुरूच राहिले, असे गटशिक्षणाधिकारी गारूडकर यांनी सांगितले.

Back to top button