संगमनेर पालिकेकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त | पुढारी

संगमनेर पालिकेकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : संगमनेरच्या भाजी मंडईत व्यापारी व ग्राहकांना त्रास देऊन धुडगूस घालणार्‍या मोकाट जनावरांचा त्रास असाहाय्य झाल्याने संगमनेर येथील नवभारत माहिती अधिकार, पोलिस मित्र फौंडेशनच्या उपाध्यक्षा कल्पना काळे यांनी व व्यापारी आणि ग्राहकांच्या तक्रारीवरून संगमनेर नगरपालिकेने तात्काळ कारवाई जनावरांचा बंदोबस्त केला आहे.

भाजी मंडईत असणार्‍या व्यापार्‍यांचे या मोकाट जनावरांपासून नुकसान होत होते. त्याचबरोबर भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणार्‍या ग्राहकांना मोकाट जनावरांपासून मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा मोकाट जनावरांनी काही व्यापारी व ग्राहकांना जखमी केल्याच्याही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

त्यामुळे मोकाट जनावरांचा त्रास असाहाय्य होऊ लागल्याने कल्पना काळे आणि व्यापारी व ग्राहकांनी संगमनेर नगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत पालिकेने दोन दिवसांमध्ये तब्बल पंधरा मोकाट जनावरे त्यामध्ये काही वासरे व गाई यांना पिंजर्‍यात टाकून पांजरपोळ येथे सोडून देण्यात आले. पालिकेचे अरविंद गुजर, सतीश बुरुंगुळे, रवी गायकवाड आदींनी कार्यवाही केली.

जनावरांचा वाहतुकीस नेहमीच अडथळा
संगमनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजी मंडई बरोबरच शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ही मोकाट जनावरे बिनधास्तपणे फिरत असतात. तसेच, रस्त्यांमध्ये बसत असतात. त्यामुळे वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे रस्त्यांवर ठाण मांडून बसणार्‍या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरजही आहे.

Back to top button