कर्जत नगरपंचायतीचे महत्त्वाकांक्षी पाऊल, अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय | पुढारी

कर्जत नगरपंचायतीचे महत्त्वाकांक्षी पाऊल, अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय

कर्जत : पुढारी वृत्तसेवा: कर्जत शहरातील उपनगरांमधील अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या विशेष बैठकीमध्ये घेण्यात आला. अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंदर्भात आमदार रोहित पवार यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली.

यामध्ये कर्जत शहरातील राजीव गांधीनगर, यासीननगर, आक्काबाईनगर, सिद्धार्थनगर, अण्णा भाऊ साठेनगर, आतर गल्ली, बर्गेवाडी, गायकरवाडी, जोगेश्वरवाडी, लहुजीनगर, माळी गल्ली, शाहू कॉलनी या भागातील शासकीय जागेमध्ये जे नागरीक सन 2011 पूर्वी अतिक्रमण करून राहात आहेत, त्यांच्या जागा व घरे नियमानुकूल करण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये पाचशे ते दीड हजार चौरस फुटांच्या जागा नियमानुकूल करण्यात येणार आहेत. तसेच पाचशे चौरस फूट पेक्षा अधिकच्या जागांसाठी शासकीय दरानुसार (रेडिरेकनर) दहा टक्के शुल्क भरून अतिक्रमणे नियमानुकूल करता येणार आहेत. अशा प्रकारची प्रक्रिया यापूर्वी कधीही राबवलेली नाही. ही योजना पहिल्यांदाच कर्जत नगरपंचायत हद्दीत राबवली जात आहे. तसेच मागासवर्गीय व आदिवासी प्रवर्गासाठी कसलेही शुल्क लागू राहणार नाही.

या बैठकीचे आयोजन नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, सर्व समित्यांचे सभापती व सर्व नगरसेवकांनी केले होते. या बैठकीस कर्जतचे प्रांताधिकारी अजित थोरबोले, बारामती नगरपरिषदे अधिकारी उपस्थित होते. या योजनेचा लाभ कर्जत नगरपंचायत हद्दीमध्ये सुमारे 1700 ते 2000 कुटुंबांना होणार आहे.

आता अतिक्रमणे नियमानुकूल होणार असल्याने नागरिकांना घरकूल योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच संबंधित जागेवर घर बांधणे व इतर कामांसाठी कर्जही उपलब्ध होऊ शकणार आहे. या संदर्भात आमदार पवार मागील एक वर्षापासून प्रयत्नशील होते. ते प्रयत्न यशस्वी झाले. या भागातील नागरिकांच्या जागेची मोजणी करण्यासाठी नगरपंचायतीचे पथक, तसेच आमदार पवार यांनी शासनमान्य एजन्सीही कागदपत्रे व मोजणी कामी उपलब्ध करून दिली आहे.

नगराध्यक्षा राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रांताधिकारी अजित थोरबोले व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी मार्गदर्शन केले. आभार उपनगराध्यक्षा घुले यांनी मानले. उपगटनेते सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, सभापती भास्कर भैलुमे, सभापती ज्योतीताई शेळके, उपसभापती लंकाताई खरात, नगरसेविका ताराकाकू कुलथे, नगरसेविका मोनालीताई तोटे, नगरसेविका सुवर्णा सुपेकर, नगरसेविका मोहिनी पिसाळ, रज्जाक झारेकरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहत्रे, भूषण ढेरे, संजय भिसे, मनोज गायकवाड, ओ. एस. साठे आदी उपस्थित होते.

Back to top button