

नगर : पुढारी वृत्तसेवा : नव्याने आलेल्या अग्निपथ योजनेमुळे सैनिक भरतीत थोडाफार बदल झाला असला तरी, ही योजना खूप फायदेशीर आहे. जे छात्र सैनिक व पोलिस भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना एनसीसीच्या वार्षिक सराव कॅम्पचा भरपूर लाभ होणार आहे, असे प्रतिपादन एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांनी केले.
नगर येथील बेसिस ट्रेनिंग रेजिमेंट (बीटीआर) मध्ये 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा वार्षिक सराव कॅम्प सुरू आहे. एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांनी कॅम्पला भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली. सहभागी छात्रांना मार्गदर्शन करून संवाद साधला. या कॅम्पमध्ये नगर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयामधील सुमारे 450 छात्र सहभागी झाले आहेत.
बीटीआरचे 57 महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कर्नल पंकज साहनी यांनी ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांचे स्वागत केले. यावेळी सुभेदार मेजर नारायण ब्रम्हा, प्रशिक्षिक दशरथ सिंग, दंडपाल अधिकारी कॅप्टन अंकुश आवारे आदींसह सर्व महाविद्यालयांचे सहयोगी एनसीसी अधिकारी उपस्थित होते.
दहा दिवस चालणार्या वार्षिक सराव कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्रांना व्यस्त दिनचर्येत पहाटे चार ते सायंकाळपर्यंत खडतर सैनिकी प्रशिक्षण देण्यात येते आहे. यात फायरिंग, ड्रील, मॅप रिडिंग याचा समावेश आहे. या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक छात्रांनी ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांच्या समक्ष केले. छात्रांनी पर्यावरण संरक्षणाबाबत आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या. या उपक्रमाचे ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांनी कौतुक केले. उत्कृष्ट फायरिंग करणार्या व रांगोळी रेखाटणार्या छात्रांनात्यांनी बक्षिसे दिली.