नगर: 153 शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये जन्म, नियुक्ती तारखेत गोंधळ | पुढारी

नगर: 153 शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये जन्म, नियुक्ती तारखेत गोंधळ

नगर: पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून 10 हजार 825 शिक्षकांनी स्वत:चे प्रोफाईल अपडेट केले आहेत. 153 शिक्षकांनी जन्मतारखा, शाळेवरील नियुक्ती तारीख चुकल्याने संबंधितांनी ऑनलाईन अपील नोंदविले आहेत. या अपिलांवर शिक्षणाधिकारी भास्कर पाटील दोन दिवसांत सुनावणी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी राज्यशासनाने टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम विकसित केली आहे. ही बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे.

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या अगोदर होणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यांतर्गत बदल्या होतील. मात्र, त्यापूर्वी शिक्षकांना लॉग ईन करून प्रोफाईल अपडेट करावे लागणार आहे. त्यामुळे बदलीसाठी पात्र असलेले व नसलेल्यांनाही ही बंधनकारक होते. त्यानुसार 13 ते 20 जून ऑनलाईन माहिती अद्यावतीकरण करणे, 14 ते 24 जून शिक्षणाधिकार्‍यांकडे अपील करणे, 26 जून शिक्षणाधिकार्‍यांनी प्रोफाईल तपासणे इत्यादीप्रमाणे कार्यक्रम तयार केलेला आहे. त्यानुसार, ही प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यात 11 हजार 108 शिक्षक
जिल्ह्यातील 11 हजार 108 शिक्षकांपैकी 10 हजार 825 शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट केले आहे. तर, 153 शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये जन्मतारीख चुकणे, शाळेवरील नियुक्तीची तारीख चुकणे आदी बाबींमुळे त्यांना अपिल करावे लागले आहे.

पुरावे मागविले जाणार!
ज्या 153 शिक्षकांनी वेगवेगळी कारणे देवून ऑनलाईन अपिल केली आहेत. अशा शिक्षकांसंर्दभातील सुनावणीपूर्वी तालुक्यातून कागदोपत्री पुरावे मागवून घेतली जाणार आहेत. त्यानंतर सुनावणी घेवून यावर निर्णय घेतला जाणार आहे.

Back to top button