नगर : पाच गटांत किरकोळ बदल; जिल्हा परिषदेचे अंतिम गट व गण प्रसिध्द

नगर : पाच गटांत किरकोळ बदल; जिल्हा परिषदेचे अंतिम गट व गण प्रसिध्द

नगर : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नगर तालुक्यातील देहरे, नवनागापूर, दरेवाडी व कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, चांदेकसारे या पाच गटांच्या प्रारूप रचनेत किरकोळ फेरबदल करुन, जिल्हा परिषदेच्या 85 गटांची व पंचायत समित्यांच्या 170 गणांची अंतिम रचना सोमवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी गट व गण निश्चित झाले असून, आता आरक्षण कार्यक्रम कधी लागणार याकडे याकडे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अहमदनगर जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समित्यांच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपल्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेचे 85 गट व पंचायत समित्यांच्या 170 गणांची प्रारुप रचना तयार केली. 2 जून 2022 रोजी प्रारुप गट व गणांच्या रचनेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येऊन 8 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. दाखल 65 हरकतींपैकी 8 हरकती मान्य करण्यात आल्या. नगर तालुक्यातील नवनागापूर गटातील वडगाव गुप्ता हे गाव देहरे गटात समाविष्ट केले. त्यामुळे वडगाव गुप्ता या गावाची लोकसंख्या अधिक असल्यामुळे देहरे गटाला वडगाव गुप्ता हे नाव देण्यात आले.

याशिवाय देहरे गटातील निमगाव वाघा हे गाव नवनागापूर गटात समाविष्ट केले आहे. दरेवाडी गटातील दहिगाव व वाटेफळ हे दोन गावे आता अंतिम रचनेत चिचोंडी पाटील गटात समावेश केले आहे. गट रचना अंतिम प्रसिध्द झाल्यामुळे आता आरक्षण कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे. यंदा या निवडणुकीसाठी ओबीसीचे आरक्षण नसणार आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गाची संख्या यंदा अधिक असणार आहे. महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असणार आहे. त्यामुळे 43 गट व 85 गणांत महिलाराज असणार आहे.

37 हजार लोकसंख्येचेही आहेत गट
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 73 गट व 146 गण होते. यंदा अकोले व पाथर्डी हे दोन तालुके वगळता प्रत्येक तालुक्यात एक गट व दोन गण वाढविण्यात आली. त्यामुळे यंदा 85 गट व 170 गण असणार आहेत. यामध्ये एकूण 1 हजार 579 महसुली गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या एका गटासाठी कमीत कमी 37 हजार ते जास्तीत जास्त 46 हजार लोकसंख्या ग्रहीत धरण्यात आलेली आहे.

औताडेंची मागणी मान्य; पोहेगाव नवा गट
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव गटाबाबत नितीन औताडे यांनी हरकत घेतली होती. या हरकतीची दखल घेतली गेली. त्यानुसार प्रारुप रचनेत पोहेगाव बुद्रूक गाव कोळपेवाडी गटात टाकण्यात आले होते. हे गाव चांदेकसारे गटात समाविष्ट करावे, अशी त्यांची मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली. पोहेगाव बुद्रूक व खुर्द हे दोन्ही गावे चांदेकसारे गटात तर चांदेकसारे गटातील मढी बु. आणि खुर्द ही दोन गावे कोळपेवाडी गटात समाविष्ट करण्यात आले. लोकसंख्या अधिक असल्यामुळे पोहेगाव बुद्रूक गट ओळखला जाणार आहे.

गट व गणांची यादी येथे उपलब्ध
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी गट व गणांची अंतिम रचना प्रसिध्द केली आहे. तहसील, पंचायत समिती कार्यालये ,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयात पाहाण्यास उपलब्ध आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर गट व गणांची यादी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news