कर्जतमध्ये सामाजिक संघटना शिलेदारांचा सन्मान | पुढारी

कर्जतमध्ये सामाजिक संघटना शिलेदारांचा सन्मान

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत पोलिस ठाण्याच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत नगरपंचायतने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. यामध्ये सलग 634 दिवस सर्व सामाजिक संघटना स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे काम शहरात करत आहेत. याबद्दल कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सामाजिक संघटनांच्या सर्व शिलेदारांचा रविवारी (दि.26) दहा वृक्ष भेट देऊन सन्मान केला.

या निमित्ताने यावेळी सर्व पोलिस कर्मचारी आणि सामाजिक संघटनांचे शिलेदार यांनी पोलिस ठाण्याच्या परिसरात श्रमदान केले.
माझी वसुंधरा अभियान पुढे सुरु ठेवण्यासाठी आणि वृक्षारोपण होण्यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी 5 वडाची आणि 5 चाफ्याची झाडे भेट दिली. यावेळी ते म्हणाले, कर्जत नगरपंचायतला माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळण्यामध्ये सामाजिक संघटनांच्या सर्व शिलेदारांचे अखंडपणे सुरू असलेले काम तितकेच मोलाचे आहे.

आपला परिसर आणि गाव आणि शहर स्वच्छ राहावे, या सामाजिक भावनेतून काम करत आहेत. त्याची सर्वत्र दखल घेतली जात आहे. सामाजिक संघटनेचे अनिल तोरडमल म्हणाले की, कर्जत पोलिस ठाण्याचा सर्व परिसर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवल्याबद्दल पोलिस निरीक्षक यादव व सर्व पोलिस कर्मचार्‍यांचे कौतुक वाटते.

माझी वसुंधरा अभियानामध्ये जे यश मिळाले, यामध्ये आपल्यासारखी काही कार्यालये सहभागी झाली. शासकीय कार्यालयांमध्ये देखील स्वच्छता आणि वृक्षारोपण अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे पोलिस ठाणे असूनही सर्वसामान्य नागरिकांना फिरण्यासाठीचे ठिकाण असल्याचा भास होतो. यावेळी विशाल मेहेत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

Back to top button