नगर : 2024 पर्यंत 1005 गावांत ‘हर घर जल’..!

नगर : 2024 पर्यंत 1005 गावांत ‘हर घर जल’..!

Published on

 नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी सन 2024 पर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 46 हजार 875 कुटूंबांना जलजीवन योजनेतून पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी देण्याचा 'मायक्रो प्लॅन' तयार केला आहे. योजनेतील 905 योजनांंपैकी 359 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या असून, 54 योजनांनाही नुकतीच मंजुरी मिळाली आहेे. 104 कामांच्या वर्क ऑर्डरही जारी झाल्या असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात सन 2024 पर्यंत प्रत्येक घरात पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 'हर घर जल' देणारी जलजीवन योजना सुरू आहे. यातून गावोगाव पाणी योजनांचे आराखडे तयार केले आहेत. दरडोई दररोज 55 लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. पाणी व स्वच्छता समितीच्या पुढाकारातून ही योजना राबविली जात आहे.

योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे आहेत. सहसचिव म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, तर योजनेचे सचिव पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता आनंद रुपनर आहेत. या योजनेत प्रकल्प संचालक डॉ. सुरेश शिंदे, पठारे आदी अधिकार्‍यांचाही सहभाग आहे.

जलजीवन मिशन ही संकल्पना केंद्राची असली, तरी त्या योजनेसाठी निधी हा केंद्र आणि राज्य दोन्ही 50-50 टक्के उपलब्ध करून देते. त्यामुळे राजकारणविरहीत ही योजना मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींचे योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकार्‍यांशी सुसंवाद ठेवून आहेत.

अपुरे मनुष्यबळ, तरीही प्रगती..!
सध्या पाणीपुरवठा विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. याशिवाय अनेक तांत्रिकी अडचणीही आहेत. मात्र, केवळ जिल्हाधिकारी व सीईओ यांना या गोष्टी अवगत असल्याने त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पाठीवर थाप टाकून त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता रुपनर आणि त्यांची सर्व टीम प्रामाणिकपणे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी परिश्रम घेताना दिसते. त्यामुळे 'जलजीवन'ची गती आणखी वाढताना दिसत आहे. हे निश्चितच येणार्‍या चांगल्या काळाचे संकेत आहेत.

सध्या कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. ते कर्मचारी अनुभवी नसले, तरी रुपनर यांनी जुन्या व नव्याचा मेळ घालून कोरोनात ऑक्सिजनवर असलेल्या जलजीवन या योजनेला संजीवनी देण्याचे काम केले आहे. येणार्‍या काळात नगर जिल्हा जलजीवन योजनेत पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये गणला जाईल, असा विश्वास सीईओ येरेकर यांनी व्यक्त केला.

अडीच लाख कनेक्शन..! जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात आनंद रुपनर यांनी गावोगावचे आराखडे बोलावून त्यांच्या मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. सन 2024 पर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 46 हजार 875 कुटुंबांना जलजीवन योजनेतून पिण्याच्या पाण्याची नळजोडणी देण्याचे नियोजन झाले आहे.

1005 गावांची तहान भागेल
गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत पाण्याच्या समस्येमुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरणार्‍या अनेक गावांसाठी जलजीवन योजना संजीवनी ठरणार आहे. या योजनेतून जिल्ह्यातील पाण्यापासून वंचित 1005 गावांसाठी 905 योजनांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. दोन वर्षांत या गावांची तहान भागणार आहे.

नव्या 257 योजनांचा समावेश
जलजीवन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 644 पाणी योजनांसाठी शासनाकडून सुमारे 878 कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर आराखड्यात आणखी भर पडली. त्यातून 257 योजनांना नव्याने मंजूरी मिळाली.एकूण 901 योजनांचा हा आराखडा तयार होऊ शकला. आता नव्याने 98 कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news