…अबब रहदारीच्या नव्या पुलाला भगदाड! | पुढारी

...अबब रहदारीच्या नव्या पुलाला भगदाड!

अकोले : पुढारी वृत्तसेवा : कोल्हार – घोटी राज्य मार्गचे रुंदीकरणाचे काम एकीकडे प्रगती पंथावर असताना दुसरीकडे मात्र अकोले- राजूर रस्त्यावर पानवा-हाळात चक्क नवीन पुलाला भगदाड पडल्याने प्रवाशी संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, हे भगदाड मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याचे दिसत आहे.

अकोले शहरालगत कोल्हार -घोटी राज्य मार्गावरील अकोले- राजुर रस्त्यावर पाणवा-हाळात पडलेल्या खड्ड्यात इंदुरी फाट्यावरील सागर नवले या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. या महामार्गावरील संकटांची मालिका काही केल्या कमी होत नाही. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे तसेच सागर नवले यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेगाळ व इंदोरी ग्रामस्थांनी अनेकदा रास्ता रोको, उपोषण, खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी अकोले सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम दर्जात्मक व लवकर करुन देण्याचे आश्वासन दिले होते.

पाच- सहा महिन्यापूर्वी पाणवा-हाळातील पुलाचे काम पूर्ण झाले, परंतु गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस पाऊस पडल्याने या पुलाला अक्षरशः भगदाड पडले. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहणांचे अपघात होत आहेत. अद्याप ठेकेदारासह प्रशासनाने हे भगदाड बुजविण्याची तसदी घेतली नाही.

‘साबां’च्या गलथान कारभाराची चौकशी करा
पानवा-हाळात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे सागर नवलेचा अपघातात मृत्यू झाल्याने मित्र गमावला. आता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारातून पानवा-हाळात नवीन झालेल्या पुलाला अक्षरशः भगदाड पडल्याने या निकृष्ट कामाची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
मारुती मेंगाळ, अकोले पं.स. माजी उपसभापती

 

Back to top button