

वारी : पुढारी वृत्तसेवा : यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने बळीराजा धास्तावला आहे. पाऊस उशिरा पडला, तरी पेरणी तर करावी लागणार आहे. पाऊस झाल्यावर बियाणे, रासायनिक खतांची टंचाई निर्माण होते, ती कृत्रिम का असेना. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे असो वा खते अगोदर खरेदी करून ठेवतात.
सध्या बाजारात बियाणे उपलब्ध आहे, पण रासायनिक खते मिळतच नाहीत. आधीच पाऊस शेतकर्यांना हुलकावणी देत असून, रासायनिक खतांचे चित्र असेच दिसत आहे. शेतकरी सोसायटी, पतसंस्था असो की, खासगी सावकाराकडून अव्वाच्या सवा व्याजदराने पैसे घेऊन खरिपाची तयारी करतो. डिझेलचे भाव वाढल्याने सर्वच मालाचे भाव गगनाला भिडले.
रासायनिक खतांच्या किमती दुप्पट वाढल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोडणार आहे. पिकांचे उत्पादन चांगले येण्यासाठी प्रयत्न करून, पैशांची जमावाजमव करून खते खरेदीला बाजारात गेल्यावर पुन्हा निराश पदरी पडत आहे. रासायनिक खतांची निर्माण झालेली टंचाई खरी आहे की, पाऊस झाल्यावर अधिक किमतीने खते विकणार्यांची शासनाने चौकशी करावी. तातडीने रासायनिक खते उपलब्ध करून द्यावेत, अशी शेतकर्यांची रास्त मागणी आहे.