नगर : कलेक्टर कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा | पुढारी

नगर : कलेक्टर कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

संगमनेर शहर: पुढारी वृत्तसेवा :  मुळानदी पत्रातून होणार्‍या अनाधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतुकीस प्रोत्साहन देऊन कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महसूल विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी, पोलिस पाटील व कोतवाल यांना निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करावी अन्यथा 27 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा घारगाव येथील शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश धात्रक यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठविले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात धात्रक म्हणाले की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदुरखंदरमाळ गावच्या खैरदरा तसेच मुळा धरण संपादित क्षेत्रातील मोरेवाडी तसेच येठेवाडी व लहूचा मळा परिसरातून गेली अनेक वर्षे मुळा नदीपात्रामधून तसेच खासगी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा केला जात आहे. याबाबत अनेकवेळा आपणाकडे तसेच महसूल अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलीही दखल घेतली गेली नाही.

तीन-चार महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय भरारी पथक तसेच जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्वतंत्र कारवाई करून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त केला होता. त्यांनी जप्त केलेला वाळूसाठा ही चोरीस गेला. याबाबत अद्याप तरी कुठलीही कारवाई झालेली नाही, तसेच नदीपात्रात पाणी असताना सुद्धा वाळूतस्करांनी नदीपात्रात उत्तर-दक्षिण असा मातीचा भरावा टाकून बांध घातला. वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर थातूर मातुर कारवाई करून सदर तस्कर निर्मितीचे सेतू नष्ट केल्याचा गवगवा केला गेला.

एक दोघांवर गुन्हाही दाखल झाला होता मात्र त्याच सेतूवरून आजही चोरटी वाळू वाहतूक चालू आहे. याबाबत मंडळाधिकारी आणि कामगार तलाठी यांनी अद्यापपर्यंत एकाही वाहनावर कारवाई केल्याचे दिसत नाही तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे या बाबतीत आपण व्यक्तिशः लक्ष घालून सदर मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल यांना तत्काळ निलंबित करावे.

Back to top button