नगर : वरुणराजाची सर्वदूर दमदार हजेरी | पुढारी

नगर : वरुणराजाची सर्वदूर दमदार हजेरी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  आर्द्रा नक्षत्राने पहिल्याच दिवशी बुधवारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावली. गेल्या 24 तासांत सरासरी 22.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक 40.6 मि.मी., तर नगर तालुक्यात 33.8 मि.मी. पाऊस झाला. श्रीगोंदा व नगर तालुक्यातील काही गावांतील छोटे तलाव ओव्हरफ्लो झाले.

जिल्ह्यातील 73 महसूल मंडलात 10 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, खरीप पेरणीला वेग येणार आहे. यंदा रोहिणी नक्षत्र कोरडेठाक गेले. मृग नक्षत्राच्या पावसाने पेरणीला वेग येईल असे वाटत होते. परंतु या नक्षत्राचे फक्त दोन पाऊस समाधानकारक झाले.

मृग नक्षत्रात सरासरी 44.3 मि.मी. पाऊस झाला. बुधवारी आर्द्रा नक्षत्राचे आगमन झाले. पहिल्याच दिवशी या पावसाने नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर व राहाता या तालुक्यांत जोरदार हजेरी लावत खरीप पेरणीसाठी वातावरण निर्मिती केली आहे. दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. जामखेड, संगमनेर, अकोले या तालुक्यात सरासरी 10 मि.मी. पावसाची नोंद झाली.

जामखेड तालुक्यात मृग नक्षत्राचे दोन पाऊस चांगले झाले आहेत. त्यामुळे पेरणी सुरू आहे. बुधवारी सर्वदूर कमी अधिक प्रमाणात आर्द्राने हजेरी लावली. नगर तालुक्यातील वाळकी महसूल मंडलात तब्बल 56.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मंडलातील गुंडेगाव व इतर गावांतील काही छोटे तलाव पाण्याने भरले गेले आहेत. नागापूर मंडलात देखील 52.3, चिचोंडी पाटील मंडलात 51.8, भिंगार मंडलात 48.5, केडगाव मंडलात 40, कापूरवाडी मंडलात 29.8, रुईछत्तीशी मंडलात 27.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. श्रीगोदा तालुक्यातील सर्वच महसूल मंडलांत पाच मंडलात सरासरी 40 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात देखील पेरणीसाठी वातावरण निर्मिती झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस (मि.मी.)
नगर 33.8, पारनेर 24.7, श्रीगोंदा 40.6, कर्जत 16.6, जामखेड 8.3, शेवगाव 27.2, पाथर्डी 24.4, नेवासा 30.4, राहुरी 28.2, संगमनेर 8.2, अकोले 7.2, कोपरगाव 11.2, श्रीरामपूर 20.4, राहाता 16.1.

कोळेगाव मंडलात अतिवृष्टी
श्रीगोंदा तालुक्यातील कोळेगाव मंडलात 66.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय इतर तालुक्यातील देवदैठण 63.8, पेडगाव 60.5, वांबोरी 60, सलबतपूर 62, वाळकी, 56.3, चिंबळा 51, श्रीगोंदा 46.3, साकीरवाडी 44.5, भाळवणी 45.7, बेलापूर मंडलात 43.5 मि.मी. पाऊस झाला.

Back to top button