नगर : डिझेल चोरांची टोळी गजाआड | पुढारी

नगर : डिझेल चोरांची टोळी गजाआड

नगर : पुढारी वृत्तसेवा : महामार्गांवर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली आहे. पकडलेले सर्व गुन्हेगार मध्यप्रदेशातील आहेत. राजाराम गंगाराम फुलेरिया (वय-38), धर्मेंद्र शिवनारायण सोलंकी (वय27), राहुल जुगलकिशोर चंदेल (वय21, सर्व रा. रामदुपाडा, मध्यप्रदेश), अशोक रामचंदर मालविय (वय 21), गोविंद पिरूलाल मालविय (वय 30, दोघे रा. सांगवी माना, मध्यप्रदेश) तसेच या आरोपींना मदत करणारा अनिकेत राजेश बोरनार (वय 24, रा. उस्थळ दुमाला, ता. नेवासा) असा पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

नगर जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गांवर रात्रीच्यावेळी थांबणार्‍या लांब पल्ल्याच्या वाहनांमधून डिझेल चोरी करण्याचे प्रकार काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तीन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथे 8 गावठी कट्टे पकडले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन दिवसांपूर्वी पोलिस पथक तपासासाठी मध्यप्रदेशकडे जात असताना वडगाव गुप्ता परिसरात काही व्यक्ती ट्रकजवळ स्कॉर्पिओ गाडी उभी करून ट्रकमधून डिझेल चोरी करत असल्याचे दिसून आले होते.

पालखी सोहळ्यात चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेरा वापरास बंदी

पोलिसांची चाहूल लागताच डिझेल चोर स्कॉर्पिओ गाडीने भरधाव वेगात राहुरीच्या दिशेला पळाले. नाकाबंदी केल्यामुळे आरोपींनी स्कॉर्पिओ गाडी रस्त्यात सोडून उसाच्या शेतात पळ काढला होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुन्हेगार हे नेवासा तालुक्यातील चांदा येथे कैलास दहातोंडे यांच्या वस्तीवर भाडे तत्त्वावर राहत असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली.

तसेच ते सामानाची आवराआवर करून मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही समजले. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने चांदा येथे जावून आरोपींचा शोध घेतला. त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी शेतात पळू लागले. पोलिसांनी दोन किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून चोरलेले डिझेल, प्लास्टिकचे ड्रम, स्कॉर्पिओ गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

Back to top button