संगमनेर: पैसे लुटल्याच्या बनावप्रकरणी दोघे ताब्यात

संगमनेर: पैसे लुटल्याच्या बनावप्रकरणी दोघे ताब्यात
Published on
Updated on

संगमनेर शहर : संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी वसूल केलेली 9 हजार रुपयांची रक्कम लुटल्याचा बनाव करणारा ग्रामपंचायत कर्मचारी व त्याच्या साथीदाराच्या पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने कोकणगावला जाऊन मुसक्या आवळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या गुन्ह्याची उकल झाल्याने फिर्यादीच आरोपी सिद्ध झाला आहे. शिकारी खुद शिकार हो गया, अशी चर्चा सध्या कोकणगाव परिसरात झडत असल्याने भामट्यांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे दिसत आहे.

याबाबत संगमनेर उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांच्याकडून समजलेली माहिती अशी, संगमनेर – लोणी रोडवर कोकणगाव येथील अजय अर्जुन जोंधळे (रा. कोकणगाव) हा गावामध्ये पाणीवाटपाचे काम करत होता. त्याच्याकडे पाणीवाटपाची 9 हजार रुपयांची रक्कम जमा झाली होती. ती रक्कम संगमनेर येथे तिघा अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची फिर्याद शहर पोलिसात अजय जोंधळे याने दिली होती.

संगमनेर उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांनी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेत, पथकातील पो. ना. अण्णासाहेब दातीर, पो. कॉ. फुरकान शेख, अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांना तपासाचे आदेश दिले होते. या पथकाने आजू बाजूचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. तांत्रिक तपास केला असता हा गुन्हा घडलेला नसून, फिर्यादीनेच कोकणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीवाटपाची रोख रक्कम हडप करण्यासाठी बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी फिर्यादीस ताब्यात घेतले. हा बनाव करण्याकरिता साथीदार विजय राजेंद्र पारधी (रा. शिवापूर, कोकण गाव) याने मदत केल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेत त्याची कसून चौकशी आली असता, हा गुन्हा आपणच केल्याचे त्यानेसुद्धा कुबली दिल्याने या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पथकाने बनाव केलेल्या रकमेपैकी 780 रुपये रोकड हस्तगत केली. बाकी रक्कम इतर ठिकाणी खर्च केल्याचे त्या दोघांनी सांगितले. या दोघांना पुढील कारवाईसाठी संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले या करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news