संगमनेर: शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा, खरीप पेरण्या खोळंबल्याने सर्वत्र निराशेचे वातावरण

संगमनेर: शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा, खरीप पेरण्या खोळंबल्याने सर्वत्र निराशेचे वातावरण
Published on
Updated on

संगमनेर: खरिपाच्या पेरण्यांसाठी महत्त्वपूर्ण समजले जाणारे 'मृग' नक्षत्र सुरू होऊन दहा ते बारा दिवसांचा कालावधी उलटला, तरी अद्याप पाऊस पडण्याचे नाव काही घेईना. त्यामुळे बळीराजा चांगलाच चिंतेत पडला आहे. पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्याने शेतकरी ' बरसोरे मेघा.. बरसो.. असे म्हणत आकाशाकडे नजर लावून बसल्याचे दिसत आहे.

संगमनेर तालुक्यामध्ये मागील वर्षी मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरच पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. थोड्याफार पावसावर शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र, नंतरच्या काळात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे खरीप पेरण्या वाया जातात की काय, अशी भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली होती. अशीच परिस्थिती यावर्षीसुद्धा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेला दिसत आहे.

संगमनेर तालुक्यामध्ये चालू वर्षी खरिपाकरिता 56 हजार 837 हेकटरक्षेत्र कृषी विभागाने अधिग्रहित केले आहे. यावर्षी सोयाबीनखाली 17 हजार 40 हेक्टर क्षेत्रअधिग्रहित केले आहे. या खालोखाल बाजरी पिकाखाली 14 हजार 245 हेक्टर, मका पिकाखाली 16 हजार 680 खरिपातील उसाचे 32 हजार हेक्टर क्षेत्र अधिग्रहित केले आहे. सर्वात कमी उडीद 14 हेकटर क्षेत्र प्रस्तावित आहे. मात्र, 1 जूनपासून आजपर्यंत संपूर्ण तालुक्यात 37.7 मिमी एवढाच पाऊस पडला. त्या पावसावर खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत, परंतु तालुक्यात ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा सद्य स्थितीला 544 हेकटर क्षेत्रावर सर्वाधिक 261 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. त्या खालोखाल मका 187.50 हेक्टरवर, सोयाबीन 56 हेक्टरवर पेरणी झाली. मात्र, तालुक्याचे सर्वात महत्त्वाचे पीक बाजरीची अवघी 5 हेक्टरवर पेरणी झाली.

संगमनेर तालुक्यात सहा ते सात दिवसांपूर्वी वादळ वार्‍यासह पाऊस झाला, परंतु त्यात वादळाचे प्रमाण जास्त अन् पावसाचे प्रमाण कमी अशी परिस्थिती असल्यामुळे शेतकर्‍यांनी त्या पावसाच्या भरवशावर खरिपाच्या पेरण्या न करता शेतीची फक्त पेरणीपूर्व मशागती करून ठेवली आहे. अवकाळी पावसानंतर शेतकर्‍यांच्या खरिपाच्या पेरण्यांना लायक असणारे मृग नक्षत्र सुरू होऊन दहा ते बारा दिवस झाले, तरी सुद्धा आकाशात फक्त काळे ढग दाटून येतात.

संगमनेर शहरातील खरिपाच्या पेरण्यासाठी लागणार्‍या खते, बियाणे औषधांची दुकाने थाटून दुकानदार बसले. मात्र, पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी राजा खते, बियाणे, औषधे घेण्यासाठी दुकानात येत नसल्यामुळे दुकानदार आता शेतकरी राजाची खते-बियाणे खरेदी करण्यास येण्याची वाट पहात बसले आहेत. खरिप पेरण्या खोळंबणार? मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी खरीप पेरण्या खोळंबल्या जात की काय, अशी चिंता तालुक्यातील शेतकर्‍यांना लागून राहिली आहे.

चालू वर्षी हवामान खात्याने दिलेले अंदाज फोल ठरत आहे, जर थोडा पाऊस पडला, तर शेतकरी लगेचच खरिपाच्या पेरण्यांना लागतो. मात्र, शेतकर्‍यांनी 90 मिमीच्या पुढे पाऊस पडल्याशिवाय आणि जमिनीत पीक उगविण्यायोग्य वापसा झाल्याशिवाय खरिपाच्या पेरण्या करू नयेत, असे आवाहन संगमनेर तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news