कार्यकर्त्यांचा वापर करणारी मी नव्हे: पंकजा मुंडे

कार्यकर्त्यांचा वापर करणारी मी नव्हे: पंकजा मुंडे

पाथर्डी शहर, पुढारी वृत्तसेवा: कार्यकर्त्यांचा उद्रेक आणि नाराजी दूर करून त्यांना शांत करण्याचे काम माझे आहे. एक-दोन कार्यकर्ते कोणत्या नेत्यांचे अपमान करून पक्षाची बदनामी करत असतील, तर त्यांची पाठराखण करण्याचा वारसा स्व. गोपीनाथ मुंडे यांचा नाही. मला रस्त्यावर यायचेच असते, तर दोन-चार लोकांनी भागले असते का? मला अशा गोष्टी करायच्या नाहीत. पाठीत वार आणि कार्यकर्त्यांचा वापर करणारी पंकजा मुंडे नाही. तसे संस्कार स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केलेले नाहीत, असे प्रतिपादन माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ठिक-ठिकाणी मुंडे समर्थकांनी जाहीरपणे भाजपाच्या राज्याच्या नेवृत्वावर नाराजी व्यक्त करून टीका व आंदोलने केली. त्यावर मुंडे यांनी भूमिका स्पष्ट करून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. माजी मंत्री मुंडे यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर पूजा, आरती करून दर्शन घेतले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी सभापती सुनिता दौंड, अभय आव्हाड, गोकुळ दौंड, राहुल राजळे, माणिक खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, अमोल गर्जे, विष्णूपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

मुंडे नगर येथून वाहनाने पाथर्डीकडे येत असताना ठिक-ठिकाणी कार्यर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. फुलांचा वर्षाव, स्वागत कमानींमुळे मुंडे यांच्या या दौर्‍याला शक्ती प्रदर्शनाचा रंग चढला होता. मुंडे म्हणाल्या की, राजकारणात हार-जीत त्याप्रमाणे डावपेच चालत असतात. पण जनतेशी प्रेम करणार्‍या नेत्यांनी डावपेच करणे हे मला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी शिकवले नाही. माझ्या पदावर विराजमान होण्यासाठी मी राजकारणात आले नाही. आपल्यामुळे एखादा कार्यकर्ता आमदार, खासदार किंवा अन्य पदावर जात असेल, तर त्याचा मला आनंद, अभिमान आहे. मला माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाची, नेत्यांची व माझ्यावर असलेल्या संस्कारांची काळजी आहे. जे संस्कार स्व. गोपीनाथ मुंडे यांनी दिले, त्या संस्काराला तडा जाऊन न देण्याची काळजी मला आहे. म्हणून मी संयम पाळून शांत आहे.

उमेदवारी मिळाली नाही, म्हणून कार्यकर्त्यांना वाईट वाटले. तसे मलाही वाईट वाटले. मी मनाचा मोठेपणा दाखवला. पंकजा मुंडे जे आहे, ते स्पष्ट बोलते. कोणाला संधी मिळाली म्हणून तिरस्कार करणे हे माझे संस्कार नाहीत. ज्याला मिळाले त्याला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी ताई काय करायचे, आदेश द्या, असे कार्यकर्त्यांची म्हणणे होते. पण तुम्हाला अडचणीत टाकून मला काहीही करायचे नाही. तुमच्यासाठी मी राजकारणात आहे. तुम्ही ज्यादिवशी म्हणाल त्यावेळीच खुर्चीवरून उतरेल. धाडस आणि सत्याने समोरून लढायचे. पाठीमागून वार करणे आपल्याला शोभणारे नाही. मी संयमाने पावले उचलते. ते म्हणजे कार्यकर्ते घडवण्यासाठी बघडवणे हे माझ्या रक्तात नाही. जीवनात कोणत्या पदावर नसताना हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते स्वागत करून प्रेम करता, असेच श्रीमंत मला राहू दे, अशी मोहटादेवी चरणी प्रार्थना केल्याचे मुंडे म्हणाल्या.

लोकांच्या एवढ्या प्रेमापेक्षा कोणते मोठे पद मला मिळणार, असा सवालही मुंडे यांनी केला. आप जननेता हो मला हे माझ्या दिल्लीतील नेत्यांनी नेहमी सांगितले आहे. जननेता जनतेतूनच जात असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा गुरू कोणाला सापडणार नाही. सगळीच युद्धे जिंकायची नसतात. काही ठिकाणी तह करावा लागतो. शिवाजी महाराज घाबरत होते म्हणून तह नव्हता, तर आपले सैन्य मरू नये, म्हणून तह होता. राजकारण सुद्धा युद्धासारखेच जिंकण्यासाठी आहे. आपल्या लोकांसाठी तह करण्यासाठीही आहे. मी तुमचे घर चालवत नाही. तरी तुम्ही कार्यकर्ते जे माझ्यासाठी करता, ते कोणत्याच नेत्याच्या भाग्यात नाही. हे नाते असेच राहू द्या.

माझ्या बुद्धीवर विश्वास ठेवा. नशिबात कमी-जास्त होईल. बुद्धी कमी होणार नाही. सन्मान ठेवून लढाई लढणे अवघड नाही. आपली ताकत ठेवलीच पाहिजे. पण पंकजाताईंचा कार्यकर्ता हा पंकजाताईला शोभणारा हवा. राजकीय जीवनात कधीही माझ्या तोंडून अपशब्द निघाला नाही. कितीही वाईट प्रसंग येउ द्या, पातळी सोडून राजकारण केले नाही. म्हणून कार्यकर्त्यांनीही पातळी सोडायची नाही. मोहटादेवीचे आशीर्वाद घेऊन पीडित, वंचितांची लढाई लढण्यासाठी तयार राहू. भविष्यात तुम्हाला संदेश देईल, त्या पद्धतीने पुढील वाटचाल करू. शांत आणि संयमाने आपण पुढचा प्रवास करू. भविष्यात आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी मिळत राहिल. सेवा करायला कोणत्या संधीची आवश्यकता नाही, असेही मुंडे म्हणाल्या.

मुकुंद गर्जे यांची विचारपूस

विधान परिषदेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना नाकारल्यानंतर नैराश्यातून मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी 9 जून रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मुंडे पाथर्डीच्या दौर्‍यावर आल्या असता त्यांनी मुकुंद गर्जे यांची घरी जाऊन विचारपूस केली. कार्यकर्ता मुंडे कुटुंबियांवरील प्रेमापोटी जीव देतोय, असे प्रेम नकोय. कृपा करून कोणीही असा प्रयोग करू नका. याचा मानसिक त्रास होतो. संयमाने घ्या, असे आवाहन मुंडे यांनी केले.

एवढी वाईट वेळ माझ्यावर नाही

माझ्या कार्यकर्त्यांनी कोणाचाही अवमान करायचा नाही. उमेदवारी मिळाली नाही, म्हणून माझ्यासाठी काही लोकांनी आत्मकेश केला. त्यांची ओळखही नाही. ठीक आहे, त्यांचा भावनांचा सन्मान आहे. पण कार्यकर्त्यांनी शिव्या, अवमान करणे असे कृत्य करू नये. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन राजकारणातील पदे मिळवायची एवढी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही, असे मुंडे म्हणाल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news