नेवासा : विवाहितेची विष पिऊन आत्महत्या, माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी सासरच्या दारापुढे केले अंत्यसंस्कार | पुढारी

नेवासा : विवाहितेची विष पिऊन आत्महत्या, माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी सासरच्या दारापुढे केले अंत्यसंस्कार

नेवासा, पुढारी वृत्तसेवा: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने माहेरी येऊन विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.20) नेवासा तालुक्यातील गेवराई येथे घडली. माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी विवाहितेचा मृतदेह सासरी नेवून घरासमोर अंत्यसंस्कार केला. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह सासू-सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई येथील नानासाहेब कर्डिले यांच्या मुलीचे लग्न सामनगाव (ता.शेवगाव) येथील सुधीर सुरेश कापरे याच्याशी दोन महिन्यांपूर्वी झाले होते.लग्नात ठरल्याप्रमाणे हुंड्याच्या स्वरूपात नवरदेवाला पाच लाख रुपये, सहा तोळे सोन्याचे दागिने दिलेले होते. हुंड्याचे राहिलेले एक लाख पंच्याहत्तर हजार रूपये, सोनाराचे पैसे व मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता.

या त्रासाला कंटाळून विवाहितेने माहेरी येऊन विषारी औषध प्राशन केले.उपचारादरम्यान या विवाहितेचा मृत्यू झाला.
नेवासा पोलिस ठाण्यात मुलीची आई अर्चना नानासाहेब कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेची सासू मुक्ताबाई कापरे, सासरा सुरेश कापरे, नवरा सुधीर कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाईकांनी विवाहितेचा मृतदेह सासरी सामनगाव येथे नेऊन सासरच्या दारापुढे अंत्यसंस्कार केले. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

Back to top button