नगर : गडाखांची ‘मुळा’ पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात! | पुढारी

नगर : गडाखांची ‘मुळा’ पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात!

सोनई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखालील मुळा एज्युकेशन सोसायटीमागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे सोनईतील कट्टर समर्थक आगळे यांनी 2019 मध्ये दिल्ली येथील हरित लवादाकडे तक्रार करून मुळा एज्युकेशन सोसायटीची जागा ही वन विभागाच्या ताब्यात देण्यात यावी व संस्थेला टाळे ठोकण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली होती.

परंतू मुळा एज्युकेशन सोसायटीने त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेऊन तात्पुरता दिलासा मिळवित मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्था चालवण्यास परवानगी मिळविली होती. माजी आमदार मुरकुटे समर्थक आगळे यांनी दिल्लीत राजकीय ताकद वापरून दुसर्‍यांदा मुळा एज्युकेशन सोसायटीच्या जागेची तक्रार केली आहे.

मिरजेत दारू विक्री जोमात; कारवाई कोमात

यानुसार दिल्ली येथील वन विभागाचे अधिकारी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या चौकशीसाठी येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली. त्यामुळे मुळा एज्युकेशन सोसायटी व संस्थेचे मार्गदर्शक मंत्री शंकरराव गडाख यांना हा मोठा झटका मानला जात आहे.

मंत्री गडाखांच्या ताब्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीचे आता काय होणार अशी भीती आता मुळा एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी,पालक व कर्मचारी यांच्या मध्ये निर्माण झाली आहे. नेवासा तालुक्यातील अग्रणी शिक्षणा संस्था असलेल्या मुळामागे चौकशीचा लागलेला ससेमिरा थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित करत गडाख समर्थकांसह विद्यार्थ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

सोलापूर : ‘पीओपी’च्या चार लाख गणेशमूर्ती विक्रीचा पेच

चौकशीचा फेरा मागे लावत मंत्री शंकरराव गडाख यांना त्यांच्या विरोधकांनी पुरते घेरल्याची स्थिती निमार्ण झाली आहे.
मंत्री गडाख यांच्या ताब्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीची दुसर्‍यांदा थेट दिल्ली येथून चौकशी करण्यासाठी माजी आमदार मुरकुटे समर्थक आगळे यांनी गडाख विरोधकांची ताकद वापरून सोसायटीची जागा ताब्यात घेऊन संस्था बंद करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. आता या चौकशीत गडाख बाजी मारणार की विरोधक? याची उत्सुकता जिल्ह्याला लागून आहे.

चौकशीचा ससेमिरा अन् आरोपाने मंत्री गडाख हैराण
विरोधकांकडून सतत लावल्या जाणार्‍या चौकशा, एकामागोमाग होणारे आरोप यामुळे हैराण झालेले मंत्री शंकरराव गडाख व त्यांच्या अधिपत्याखाली असणारी मुळा एज्युकेशन सोसायटीचे नेमके काय होणार, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. गडाख त्याचा लवकरच फैसला करतील, अशी आशा गडाख समर्थकांना आहे. न्यायालयीन लढाई लढून विरोधक मंत्री गडाख यांना सळो की पळो करत असल्याची परिस्थिती नेवासा तालुक्यात पहावयास मिळत आहे.

‘मुळा’ शैक्षणिक संस्थेत गरिबांची मुले शिक्षण घेतात. नेवासा तालुक्याच्या धार्मिक, सामाजिक तसेच अनेक सामाजिक कार्यात ‘मुळा’चे मोठे योगदान आहे. परंतु माजी आमदार मुरकुटेंना हे सर्व देखवत नसल्याने असे प्रकार ते करत आहेत. दुसर्‍यांदा चौकशी लावण्यामागे माजी आमदारांचाच हात आहे.
-प्रकाश शेटे

Back to top button