

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा : एखाद्या नेत्यावर निष्ठा किती असावी, याचे ज्वलंत उदाहरण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक गणपतराव शिंदे यांनी दाखवून दिले. माजी मंत्री, भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पा. यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांनी स्वखर्चातून रहिमपूर-जोर्वे शिव रस्त्याचे मुरमीकरण केले. त्यांच्या या उपक्रमाला या दोन्ही गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पा. यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांनी वायफळ खर्चाला फाटा देत अनोखा उपक्रम राबवला. भर पावसाळ्यात रहिमपूर-जोर्वे शिव रस्त्याने या दोन्ही गावातील नागरिकांना रस्त्यात चिखल झाल्याने जाण्या-येण्यास अडचणी निर्माण होतात, ही बाब गणपतराव शिंदे यांच्या लक्षात आली. त्यांनी विखे पा. यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वखर्चातून या रस्त्याचे मुरमीकरण केले. परिसरातून शिंदे यांच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
मुरमीकरण शुभारंभप्रसंगी रहिमपूरचे माजी सरपंच शांताराम शिंदे, जोर्वेचे सरपंच गोकुळ दिघे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सचिन शिंदे, आप्पासाहेब शिंदे, दिलीप इंगळे, पप्पू गाढे, अशोक गुळवे, अरुण शिंदे, बबनराव शिंदे, बाबासाहेब शिंदे, प्रभाकर गुळवे, गोरक्षनाथ वाळुंज, संपत राक्षे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.