नगर : सव्वा कोटींचा विदेशी मद्यसाठा हस्तगत | पुढारी

नगर : सव्वा कोटींचा विदेशी मद्यसाठा हस्तगत

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे व नगरच्या भरारी पथकांनी संयुक्त मोहीम राबवित गोवा राज्यात विक्रीसाठी पाठविला जाणारा विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावरील पळवे शिवारात ही कारवाई करण्यात आली. 1 कोटी 21 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक- नारायणगाव व तळेगाव दाभाडे, निरीक्षक-भरारी पथक क्र.1 अहमदनगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दि.16 जून रोजी पारनेर तालुक्यातील नगर- पुणे महामार्गावरील हॉटेल गारवासमोर पळवे शिवारात गोवा राज्यात विक्रीसाठी पाठविला जात असलेल्या विदेशी मद्यासह भरलेल्या कंटेनरसह चालक प्रदीप परमेश्वर पवार (ता.तांबोळी, ता.मोहोळ, जि. सोलापूर) यास ताब्यात घेतले.

या कंटेनरमध्ये विदेशी मद्याचे 1550 बॉक्स आढळून आलेत. या गुन्ह्यात प्रथमदर्शनी बापू भोसले (खवनी, ता.मोहोळ, जि.सोलापूर) व निखिल कोकाटे (रा.तांबोळी, ता.मोहोळ, जि.सोलापूर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनील चव्हाण, पुणे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, नगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक बी. टी. घोरतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे अधीक्षक सी. बी. राजपूत, नारायणगावचे दुय्यम निरीक्षक महिपाल धोका, तळेगाव दाभाडे दुय्यम निरीक्षक दीपक सुपे, निरीक्षक ए.बी.बनकर, आर. पी. दांगट, संजय विधाटे, तुळशीराम करंजुले, जवान सर्वरी, निहाल उके, सूरज पवार, एन. आर. ठोकळ, शुभांगी आठरे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक ओ.बी.बनकर करत आहेत. गुन्ह्यातील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

Back to top button