नगर : नेवासा तालुक्याला आणखी पावसाची प्रतीक्षा | पुढारी

नगर : नेवासा तालुक्याला आणखी पावसाची प्रतीक्षा

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : सोमवारी रात्री नेवासा तालुक्यात पहिल्याच पावसाने शेतकरी सुखावला असला, तरी खरीप पेरणीसाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. नेवासा तालुक्यात सरासरी 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला असला, तरी नेवासा तालुक्यात केवळ पावसाचे वातावरण निर्माण होत होते.

ढगाळ वातावरण व गार वार्‍याचा झटका नागरिकांना बसत होता. सर्वत्र पावसाचीच चर्चा असतानाच सोमवारी रात्री 8 च्या सुमारास जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. तास-दीड तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव, वडाळा बहिरोबा, नेवासा फाटा, देवगड, कुकाणा, पानेगाव, करजगाव, शिरसगाव, खडका, मक्तापूर, गोंडेगाव, पिचडगाव, मुकिंदपूर, म्हसले, सोनई, सलाबतपूर आदी भागात कमी अधिक फरकाने पाऊस झाला.

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शेतकर्‍यांची चांगलीच धावपळ उडाली होती. शेतकर्‍यांनी भरून ठेवलेल्या कांदा गोण्या झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली. काहींनी पावसाअगोदर केलेल्या कपाशी लागवडी पिकांना दिलासा मिळाला.

उकाड्याने नागरिक हैराण
पहिलाच पाऊस असल्याने मंगळवारी दिवसभर नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. सोमवारच्या पावसाने कपाशी लागवडीला मुहूर्त मिळाला आहे. कमी अधिक फरकाने पाऊस झाल्याने पेरणीसाठी ओल अद्याप म्हणावी, अशी नसल्याने नेवासा तालुक्यात खरीप हंगामासाठी पेरणीयुक्त दमदार पावसाची गरज आहे. सोमवारी झालेल्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सायंकाळी पावसाचे वातावरण होते. शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे

Back to top button