लोणी व्यंकनाथ सोसायटी; नाहटांच्या अस्तित्वाची लढाई | पुढारी

लोणी व्यंकनाथ सोसायटी; नाहटांच्या अस्तित्वाची लढाई

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा: श्रीगोंदा तालुक्यात सेवा संस्था निवडणुकांचा धडाका सुरू आहे. त्यात बहुचर्चित लोणी व्यंकनाथ सोसायटीची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. सोसायटीत कोट्यवधी रुपयांची झालेली अनियमितता, संचालक मंडळावर दाखल झालेले गुन्हे, बेकायदा कर्ज वाटप हे मुद्दे निवडणुकीत कळीचे ठरणार आहेत. संस्थेचे सभासद या निवडणुकीत सत्तांतर करतात की पुन्हा एकदा नाहटा यांच्याकडे सत्तेच्या चाव्या देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मात्र ही निवडणूक राज्य बाजार समिती महासंघाचे संचालक बाळासाहेब नाहाटा यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे.
बेलवंडी सेवा संस्था निवडणुकीत अण्णासाहेब शेलार यांनी बाजी मारल्यानंतर लोणी व्यंकनाथ सोसायटीच्या निवडणुकीत काय होणार, याबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे. संस्थेचे सर्वेसर्वा राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा हे राज्यव्यापी नेतृत्व करत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे.

विधानपरिषद निकालानंतर कोणाकडे कौशल्य आहे हे कळेल; अजित पवारांचा इशारा

लोणी सेवा संस्थेची निवडणूक सुरू झाल्यानंतर तेरा पैकी एक जागा बिनविरोध झाली. हा संचालक कोणाचा, यावरून श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. या निवडणुकीत बाळासाहेब नाहटा व शिवाजीराव जाधव यांनी एकत्र येऊन पॅनेल तयार केला आहे. दुसरीकडे डी. आर. काकडे व गणपतराव काकडे यांनी एकत्र पॅनेल केला आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. दोन्ही गटांनी प्रचाराची मोहीम जोरात हाती घेतली असून दोन्ही गट सेवा संस्थेच्या विकासाची ग्वाही देत आहे.

गेल्या पाच वर्षांत लोणी सेवा संस्था तालुक्यात चर्चेत आहे. एका महिलेला विमा देताना संस्थेच्या पदाधिकार्‍याने अफरातफर केली होती. प्रकरण अंगलट आल्यानंतर त्या महिलेस विम्याचे पैसे देण्यात आले. आज संस्था तोट्यात आहे. इतर संस्था फायद्यात असताना लोणी सेवा संस्था का तोट्यात गेली, याचाही सभासद विचार करणार आहेत.

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या १ वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

संस्थेची निवडणूक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्याचे नेते बाळासाहेब नाहटा, मितेश नाहटा गावात ठाण मांडून आहेत. पॅनेलचा पराभव झाला, तर नामुष्की ओढवेल या भीतीने नाहटा आणि यंत्रणा घरोघर जाऊन पॅटर्न राबवू लागले आहेत. विरोधी पॅनेल प्रमुखांनीही यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे.

नाहटा यांच्या घरातील कुणाचीही उमेदवारी नसली, तरी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने ते निवडणूक जिंकण्यासाठी युद्ध पातळीवर शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. नाहटा यांनी नागवडे कारखाना निवडणुकीत नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यावर तोफ डागत निशाणा साधला होता. नागवडे यांना शक्य तेथे विरोध करत असल्याने नागवडे-नाहटा वाद चांगलाच चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागवडे यांनी लोणी संस्थेत लक्ष घातले असून सगळ्या प्रकारची रसद पुरविण्याची तजवीज ठेवली आहे.

दि. 17 जून रोजी मतदान आणि त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

यंदा आम्हालाच संधी
राजेंद्र काकडे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत संस्थेत काय काय गैरकारभार झाले, हे सर्वश्रुत आहे. प्रचारादरम्यान मतदारांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. निकालात सगळे स्पष्ट होईल.

मतदार आमच्या सोबत
पॅनेल प्रमुख शिवाजी जाधव म्हणाले, बाळासाहेब नाहटा व आम्ही एकत्र येऊन पॅनेल तयार केला आहे.सभासद आमच्यासोबत असून 17 जूनला निकाल लागल्यानंतर चित्र स्पष्ट होईलच

Back to top button