

नगर : पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्याच्या तोंडावर सीना नदीसह शहरातील वीस नाल्यांची सफाई केली जाते. यंदा पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईच्या वीस लाखांच्या निविदेला मान्यता मिळाल्यानंतर आजमितीस शहरातील 80 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेतर्फे केला जात आहे.
पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी घुसू नये म्हणून दरवर्षी शहरातील नालेसफाई केली जाते. त्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया केली जाते. यंदाही महापालिकेकडून निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासाठी साधारण वीस लाखांपर्यंतच्या दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, या सार्या प्रक्रियेला आणि बजेट मंजुरीला विलंब झाल्याने प्रत्यक्षात नालेसफाईला उशिर झाला.
तरीही नालेसफाईची निविदा निघाल्यानंतर त्यास कार्यरंभ आदेश देण्यात आला आणि प्रत्यक्षात नालेसफाईला सुरूवात झाली. आजमितीला शहरातील मुख्य नाल्यांची सफाई झाली असून, केवळ वीस टक्के नालेसफाईल राहिली आहे. त्यात सीना नदीचा बराचसा भाग आहे. सीना साफसफाईसाठी बोल्हेगाव येथून सुरूवात केली आहे. येत्या काही दिवसांत सीना नदीतील गाळ व कचरा हटविण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
सीना नदी सफाईला गती हवी
पावसाळ्यात सीना नदीची सफाई होणे अत्यंत आवश्यक असते. कारण नदीला पूर आल्यानंतर ते पाणी नालेगाव अमरधाम परिसरात घरामध्ये घुसते. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे सीना नदीच्या सफाई मोहिमेला गती देणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.