करंजी : पुढारी वूत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील करंजी, दगडवाडी, भोसे, वैजूबाभळगाव, सातवड, घाटशिरस, देवराई परिसरात गेल्या दोन चार दिवसापासून पाऊस पडत आहे. त्यामुळे हा पाऊस शेतकर्यांसाठी पेरणी युक्त ठरला. शनिवारपासून पावसाने दमदार सुरुवात केली. त्यानंतर मंगळवारपर्यंत दररोज पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांसाठी हा पाऊस महत्त्वपूर्ण ठरला.
मंगळवारीही दुपारनंतर पावसाने करंजीत हजेरी लावल्याने आठवडे बाजारातील भाजीपाल्यांसह व्यापारील ग्राहकांची धांदल उडाली. करंजी परिसरात वरुणराजाने सुरुवात चांगली केल्याने शेतकर्यांची पेरणीसाठी कृषी केंद्रात गर्दी होऊ लागली आहे.
आष्टी तालुक्यातील सावरगाव, गंगादेवी परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे वृद्धेश्वर परिसरातील बंधारे पहिल्याच पावसाच्या पाण्याने तुडूंब भरले आहेत. शिरापूर, करडवाडी परिसरात नद्यांना पूर आला. पावसाने यावर्षी समाधानकारक सुरुवात केली असून, त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.