नगर : राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात विजेचा खेळखंडोबा..! | पुढारी

नगर : राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात विजेचा खेळखंडोबा..!

जेऊर : पुढारी वृत्तसेवा:  नगर तालुक्यातील जेऊर परिसर गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहे. पहिल्याच पावसाने महावितरण कंपनीचे पितळ उघडे पाडल्याचे चित्र पहावयास मिळाले. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी दिला आहेे.

शनिवारी (दि.11) जेऊर परिसरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसात महावितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. परिसरातील विद्युत खांबावरील वाहिन्यांची दाणादाण उडाली. अनेक खांब, विद्युत वाहिन्या तुटून पडल्या आहेत.
चार दिवस उलटून गेले तरीही विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. जेऊर परिसरात विजेचा खेळखंडोबा ही नित्याचीच बाब बनली आहे.

पावसामुळे नादुरुस्त झालेल्या विद्युत वाहिन्या व खांबांची दुरुस्ती वीज वितरण कंपनीकडून तत्काळ करणे गरजेचे असताना कर्मचारी व अधिकार्‍यांकडून हलगर्जी करण्यात येत असल्याचा आरोपही बेल्हेकर यांनी केला.महावितरण कंपनीच्या कार्यालयात कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असून, त्यामुळे विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी नेहमीच उशीर होत असतो. गेल्या चार -पाच दिवसांपासून अनेक परिसरातील बत्ती गुल असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Back to top button