नगर : 20 हजार मुलांचे आज शाळेत ‘पहिलं पाऊल’ | पुढारी

नगर : 20 हजार मुलांचे आज शाळेत ‘पहिलं पाऊल’

नगर : पुढारी वृत्तसेवा
कोरोनामुळे मरगळ आलेल्या शिक्षण व्यवस्थेला नव्या शैक्षणिक वर्षांत शासनाकडून ‘बुस्टर’ गरजेचा आहे. दरवर्षी पहिलीला सरासरी 40 हजार प्रवेश होतात, यावर्षी 38 हजार 926 मुले प्रवेशपात्र आहेत. यातील झेडपीच्या शाळेत 20 हजार 534 प्रवेश झाले आहेत, तर उर्वरीत 18 हजार मुलांच्या प्रवेशासाठी झेडपीची ‘शाळा’ आणि इंग्रजी माध्यमांच्या ‘स्कूल’मध्ये स्पर्धा सुरू आहे.

नव्या शैक्षणिक वर्षातील शाळेचे पहिली घंटा आज बुधवार दि. 15 रोजी वाजणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट ऐकायला मिळेल. कोरोनानंतर प्रथमच पूर्णक्षमतेने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने स्वयंअर्थसहायित इंग्रजी स्कूल आणि झेडपीच्या शाळांमध्ये पहिलीचे प्रवेश सुरू आहेत.

झेडपीच्या शिक्षकांवर पटसंख्येची टांगती तलवार आहेच, शिवाय जास्तीत जास्त प्रवेश वाढविण्यासाठी सीईओ आशिष येरेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील शिक्षकांना सूचना करत आहेत. शिक्षक प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरोघरी जाऊन मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्व तयारी, कोणतीही फी नाही, अशा गोष्टी पटवून देत आहे.

तर इंग्रजी माध्यमांचे संस्थानिक आणि त्यांचा खासगी फौजफाटाही रस्त्यावर उतरला आहे. ते देखील पालकांचे घर गाठून ‘खासगी’त मिळणार्‍या सोयीसुविधा आणि मराठी शाळांची तुलना दर्शवत आहेत. झेडपीच्या सुमारे 3500 शाळांत पहिली प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी 38,926 प्रवेश पात्र विद्यार्थी असताना कालअखेर झेडपी शाळांमध्ये 20 हजार 534 प्रवेश निश्चित झाले, तर, खासगी शाळांत 1049 प्रवेश झाले आहे. उवर्रीत 17109 प्रवेश अद्याप बाकी असून त्यासाठी झेडपी शाळा प्रयत्नशील आहेत.

कोरोना काळात इंग्रजी माध्यमातून मुले मराठी शाळेत गेली होती. परंतु आज कोरोना कमी झाल्याने पालकांनी पुन्हा इंग्रजी माध्यमांना पसंती दिली आहे. जिल्ह्यातील मेस्टा संलग्न शाळांच्या पटांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
प्रा. देविदास गोडसे, जिल्हाध्यक्ष, मेस्टा , नगर

Back to top button