

सोनई: शनिशिंगणापूरला येणार्या भाविकांची गरज ओळखून खास बाब म्हणून राहुरी ते शिंगणापूर या 25 किलोमीटरच्या रस्त्याचे कामाला 111 कोटी रुपये खर्चाची मान्यता मिळाली. पण तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले काम अजूनही संथगतीने चालूच आहे. काम लवकरात लवकर उरकण्यासाठी रात्री तुटलेल्या फुटलेल्या सिमेंटच्या नळ्या टाकून बुजविण्यात येत आहेत. सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या व साईड गटारीच्या दर्जाबाबत कुणीच लक्ष देत नसल्याने ठेकेदाराच्या मनमानी साडेसातीचा फेरा पाहण्यास मिळत आहे.
सोनईतील सरकारी दवाखान्यापासून कौतुकी नदी पर्यंत सिमेंटच्या नळ्या टाकण्यासाठी रात्री साईडगटार खोदून फुटलेल्या नळ्या टाकून बुजविण्यास सुरुवात केली आहे.साईड गटारीचे काम व्यवस्थित न झाल्यास सोनईत पुराचे पाणी घुसण्याचा धोका आहे. यासह सर्व कामाची चौकशी होण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
जगप्रसिद्ध देवस्थान असलेले शिंगणापूर जे ठिकाणी सोडून जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक हा रस्ता वापरत असतात. येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी सोनई जवळील बारा वाड्यांतील ग्रामस्थ याच निकृष्ट रस्त्याने जात येत आहे. या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नाही. भरघाव चालणार्या वाहनामुळे व निकृष्ट कामामुळे अनेकांनी जीव गमावला आहे.
मुख्य रस्त्याला जोडणारे हॉटेल समाधान, डॉ बारगळ, स्वामी समर्थ केंद्र रस्ता, हे रस्ते थातूरमातूर पद्धतीने बनवले आहे. एकाच जागी उंची दिल्याने मुख्य रस्त्याला जाणार्या गाड्यांचा वेग वाढवावा लागतो, तर मुख्य रस्त्यावर चालणार्या गाड्यांचा वेग जास्त असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी ठेकेदाराने मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधकाची गरज आहे.
या निकृष्ट कामामुळे अनेक मृत्यूमुखी पडले आहेत. साईड गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यांत आतापर्यंत बरेच अपघात झाले आहेत. काही दुचाकीस्वार गाडीसह खड्ड्यात पडले असून, काही चारचाकी गाड्या गावात येण्याचा रस्त्याची रुंदी व उंची व्यवस्थित न झाल्याने साईड गटार न बुजविल्याने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात गेली आहेत. वाहनांचे नुकसान तर झालेच पण काही जखमी व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
साईडपट्टया, कपारी व्यवस्थित न बुजविल्यामुळे बरेच दुचाकीस्वार गाडीवरून पडले आहेत. तसेच मुख्य रस्त्यावर चकारी पडल्यानेही काही ठिकाणी अपघात होत आहे. या निकृष्ट कामात सहभागी असलेल्या ठेकेदार आणि संबंधित अधिकार्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत रस्त्याच्या व साईड गटारीचा दर्जा अतिशय निकृष्ट असून, पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे.