

नगर,पुढारी वृत्तसेवा: नगर जिल्हा दुग्ध उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात मोबाईल व्हेटरनिटी क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय चांगल्या प्रजातींचे जतन व संवर्धनही करण्यात येईल. गोवंश गोपालक उन्नती अभियानातून पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षकांनी गोपालकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सीईओ आशिष येरेकर यांनी केले.
नगर जिल्हा परिषदेच्या वतीने गोवंश गोपालक उन्नती अभियान हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. जि.प.मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या चर्चासत्राचे उद्घाटनप्रसंगी येरेकर बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, पशुसंवर्धनसह आयुक्त डॉ. बाबुराव नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, डॉ. विनायक सुर्वे, डॉ. संजय कुमकर, डॉ. अशोक ठवाळ, डॉ. मुकुंद राजळे आदी उपस्थित होते.
सन 2021-22 मध्ये पशुधन विकासात उत्कृष्ट तांत्रिक कामकाज करणार्या पाथर्डी, राहुरी व राहाता या तीन तालुक्यांना प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात आले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांनी प्रास्ताविकात गोवंश, गोपालक अभियानाचा उद्देश विशद केला. डॉ. मुकुंद राजळे यांनी आभार मानले.