पैगंबर यांच्याविषयी अनुद्गार काढल्यामुळे कर्जतमध्ये कडकडीत बंद | पुढारी

पैगंबर यांच्याविषयी अनुद्गार काढल्यामुळे कर्जतमध्ये कडकडीत बंद

कर्जत : पुढारी वृत्तसेवा:  प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अनुद्गार काढणार्‍या नुपूर शर्मा व नवीनकुमार जिंदल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मुस्लिम बांधवांनी मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. यात नगरसेवक रज्जाक झारेकरी, कदिर सय्यद, सचिन घुले, समशेर शेख, जब्बार शेख, माजिद सय्यद, जमशेद शेख, पप्पू शेख, शरीफ पठाण, शब्बीर पठाण, मुबारक मोगल, जाकीर सय्यद, अमिन झारेकरी, मोसिम काजी, वसीम शेख, अन्सार शेख, सुयोब काझी यांच्यासह मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुस्लिम बांधवांनी कर्जतबंदची हाक दिली होती. सर्व व्यापारी बांधवांनी उस्फूर्तपणे पाठिंबा दिला. सकाळपासून शहर व तालुक्यातील विविध ठिकाणचे व्यवहार पूर्णपणे बंद होते. दुपारी कर्जत शहरातील मशिदीपासून मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तेथे सभा झाली.

कादिर सय्यद म्हणाले की, पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याविषयी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीनकुमार जिंदल यांनी अतिशय गलिच्छ व बदनामीकारक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावत व देशाची प्रतिमा मलीन केली आहे. त्यांचा हेतू धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी.

बंदला व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व समाज त्यांचे ऋण व्यक्त करतो. शहर व तालुक्यातील एकी कायम ठेवू, असे सय्यद म्हणाले. सचिन घुले म्हणाले की, भाजपच्या प्रवक्त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. ही अतिशय निंदनीय घटना आहे. युवक काँग्रेसच्या वतीने याचा निषेध करतो. अशा बेताल वक्तव्ये करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत आहे.
यावेळी जब्बार शेख, पप्पू शेख, मुबारक मोगल यांच्यासह कर्जत, राशीन, मिरजगाव येथील मौलानांची भाषणे झाली.

Back to top button