टेम्पोमधून 5 गोवंश जनावरे दाटीवाटीने व जखमा झालेल्या अवस्थेत वाहून नेताना रंगेहाथ पकडले | पुढारी

टेम्पोमधून 5 गोवंश जनावरे दाटीवाटीने व जखमा झालेल्या अवस्थेत वाहून नेताना रंगेहाथ पकडले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात मालवाहू टेम्पोमधून 5 गोवंश जनावरे दाटीवाटीने व जखमा झालेल्या अवस्थेत वाहून नेताना कोपरगाव पोलिसांनी संवत्सर – कासली रस्त्यावर रंगेहाथ पकडले. या धाडीतील 5 गोवंश जनावरांसह टेम्पो असा साडेतीन लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, ही कारवाई बुधवारी सायंकाळी 7.35 वाजता करण्यात आली, मात्र रात्री उशीरापर्यंत टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

कोपरगाव पोलिसांनी सांगितले की, संवत्सर ते कासली रस्त्यावर टेम्पो (क्र. एमएच 16 एवाय 8145) मध्ये 5 गोवंश जनावरे कोंबून, त्यांची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली. बुधवारी सायंकाळी 7.35 वाजण्याचे सुमारास पोलिसांनी सापळा रचून या संशयित वाहनास प्रतिबंध केला. वाहन चालकास गाडी थांंबवण्याचा इशारा केला असता, तो रस्त्याच्या कडेला थांबला. वाहनाची पहाणी केली असता 5 गोवंश जनावरे दाटीवाटीने भरल्याने त्यांना ठिक-ठिकाणी जखमा दिसल्या.

पोलिसांनी टेम्पो चालक अश्पाक ईसाक सय्यद (रा. शिंगणापूर) यास ताब्यात घेत जनावरांची सुटका केली. ही पाच जनावरे कोकमठाण येथील गोकुळधाम कोकमठाण येथे सुरक्षित पोहोच केली आहेत. दरम्यान, टेम्पो चालकाने ही जनावरे शिरसगाव येथे नेण्यास जात असल्याचे व खरेदी-विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. याप्रकरणी पो. कॉ. जालिंदर पुंजाजी तमनर यांनी फिर्याद दिलेली आहे.

 

Back to top button