

नगर : पुढारी वृत्तसेवा
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा 6 जून रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी नगर जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी केले.
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याची युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. सोहळ्याला यावर्षी किमान 6 लाख शिवप्रेमी हजेरी लावतील, असा अंदाज आहे. भगवे झेंडे, ढोल ताशे, झांज पथके, शाहिरी पोवाडे यामुळे अवघे वातावरण शिवमय होणार आहे.
सोहळ्यासाठी येणार्या शिवप्रेमींच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था, गडावर पाणी, भोजन व्यवस्था, स्वच्छता याचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. शिवप्रहार संघटनेचे बहुतांश कार्यकर्ते संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली 5 जूनलाच संध्याकाळपर्यंत रायगडच्या पायथ्याशी पाचाडला पोहोचणार आहेत. 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनी राजधानी रायगडावरील पवित्र माती भाळी लाऊन शिवछत्रपतींपुढे नतमस्तक होण्यासारखा दुसरा आनंद नाही, असे भोर म्हणाले.