वाड्यावस्त्यांवरील पाण्याची वणवण थांबणार!

वाड्यावस्त्यांवरील पाण्याची वणवण थांबणार!

वळण : पुढारी वृत्तसेवा

राहुरी तालुक्यातील टाकळीमियातील मोरवाडी व परिसरातील वाड्या-वस्त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून माजी खासदार प्रसाद तनपुरे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नांतून जल जीवन मिशन अंतर्गत नवीन विहीर, पाण्याची टाकी व पाईपलाईनकरिता 1 कोटी 95 लाख 25 हजार रुपये मंजूर झाले आहे. लवकरच काम सुरू होणार असल्याचे राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती सुनीता निमसे व जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश निमसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राहुरीतील टाकळीमियासह इतर 32 गावे श्रीरामपूर मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहेत, तर पंचायत समिती, जिल्हा परिषद व अन्य निवडणुकीकरिता राहुरीला जोडलेले असल्याने या 32 गावांकडे लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होते. मात्र, श्रीमती निमसे व सुरेश निमसे हे विविध प्रश्नांसाठी तनपुरे पिता-पुत्राकडे पाठपुरावा करत असतात.

तनपुरेंनी प्रयत्न करून मंत्री जयंत पाटील, मंत्री संजय बनसोडे यांनी मोरवाडीकरिता जलजीवन मिशन अंतर्गत मुसळवाडी तलावाच्या खालच्या बाजूने नवीन 15 मीटर खोलीची व सहा मीटर व्यासाची विहीर बांधण्यासाठी, त्यावर 10 एचपीच्या दोन विद्युत मोटार बसविणे व पाईपलाईनद्वारे पाणी उचलून पाण्याची टाकी बांधून त्यात पाणी साठविणे व तेथून पाईपलाईनद्वारे वाड्या-वस्त्यांना सदर योजनेच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी ग्रामस्थांना दिले जाणार आहे.

तांत्रिक मान्यता कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अहमदनगर यांनी 22 एप्रिल रोजी दिली आहे. प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी यांनी 28 एप्रिलला दिली असल्याने हे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होईल. गेल्या अनेक वर्षांपासून टाकळीमियातील मोरवाडी व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण मिटणार आहे. दूषित पाणी पिल्याने होणारे आजार, पोटाचे विकार यामुळे आरोग्यावर होणारा खर्चही यापुढे वाचणार असल्याचे निमसे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news