दहा महिन्यांत डेंग्यूचे 212 रुग्ण ! जिल्ह्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू

दहा महिन्यांत डेंग्यूचे 212 रुग्ण !  जिल्ह्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाच्या जनजागृतीनंतरही डेंग्यूचे 10 महिन्यांत तब्बल 212 रुग्ण आढळले असून, यातील दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर या तुलनेत चिकणगुणियाचे केवळ 4 रुग्ण निदर्शनास आले असून, हिवतापाचे 10 महिन्यांत अवघे पाच रुग्ण सापडल्याचे जिल्हा हिवताप विभागाकडून समजले आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात जागोजागी पावसाचे पाणी साचते. या डबक्यांमुळे डेंग्यूसारखा भयानक आजार होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या तीन-चार महिन्यांमध्ये हे रुग्ण अधिक आढळून येतात. तर हिवाळा सुरू झाल्यानंतर डेंग्यूचे रुग्ण कमी होत असल्याचा अनुभव आहे.

जानेवारी 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जिल्हा हिवताप विभागाच्या माध्यमातून 829 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचे नमुने घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून तिसर्‍या दिवशी प्राप्त अहवालानुसार यापैकी 212 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उवर्रीत रुग्ण हे ठणठणीत बरे झाल्याचेही सांगण्यात आले.

चिकणगुणियाच्या या 10 महिन्यांत 25 रुग्णांची वेळोवेळी रक्त तपासणी केलेली आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्याने ही सर्व नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली होती. साधारणतः आठ दिवसांत तेथून अहवाल नगरला येतो. यात 25 पैकी 4 रुग्ण चिकणगुणिया बाधित आढळली होती.हे प्रमाण चिंताजनक नाही.

आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र कानडे हे वेळोवेळी कंटेनर सर्वेक्षणावर लक्ष ठेवून आहेत. आरोग्य केंद्राच्या नियंत्रणात प्रत्येक उपकेंद्रावर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि त्यांच्या मदतीला आशा सेविकांकडून घरोघरी जनजागृती केली जाते. घराभोवती स्वच्छता ठेवा, पाण्याचा निचरा करा, पाण्यावर आच्छादन ठेवा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे मार्गदर्शन केेले जाते. साठलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याची प्रक्रियाही केली जाते.

अशाप्रकारे डेंग्यूला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या नगर जिल्ह्यात गोवरचे रुग्ण अजून तरी आढळलले नाहीत. मात्र, सतर्कता म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांना ज्याचे गोवर लसीकरण राहिलेले आहे. अशा मुलांचे लसीकरण तातडीने करून घ्यावेत. तसेच गोवरचा रुग्ण निदर्शनास आला, तर याबाबत तातडीने वरिष्ठांना कळवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
 – डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news