

अमोल गव्हाणे
नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पुढाकार घेऊन अतिक्रमणांवर धाडसी कार्यवाई केली. शहरासाठी अडचणीचे ठरणारी अतिक्रमणे काढली खरी; मात्र ही अतिक्रमणे पुन्हा होणार नाहीत, यासाठी पालिका प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत, अन्यथा ही कारवाई फार्स या शब्दापुरतीच मर्यादित राहील.
श्रीगोंदा शहर झपाट्याने विकसित होत आहे. मुंबई- जामखेड राष्ट्रीय महामार्ग गेल्याने त्याचा निश्चित फायदा होणार आहे. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात शहराच्या अन्य परिसरातही अतिक्रमणे वाढल्याने शहराचा श्वास कोंडला होता.
अतिक्रमणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता; मात्र पदाधिकारी मताच्या बेरजेसाठी ठोस भूमिका घेत नव्हते. उलटपक्षी अतिक्रमण करण्यासाठी काही नगरसेवकांनीच खतपाणी घातले होते. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी याबाबत ठाम भूमिका घेत अतिक्रमण हटाव अभियान हाती घेतले. अभियानास जवळपास सर्वच नेत्यांचा विरोध होता. अतिक्रमण काढले जाऊ नये यासाठी बैठका झाल्या; मात्र मुख्याधिकारी देवरे निर्णयावर ठाम राहिले.
तीन दिवसांत जवळपास सगळ्याच रस्त्यावरील अतिक्रमणे काढली गेली. स्टँड परिसरात झालेली अतिक्रमणे डोकेदुखी ठरली होती. बाजारपेठेत जाण्यासाठी रस्ताच राहिला नव्हता. आता, ही अतिक्रमणे हटवली गेल्याने चारचाकी वाहने सहज जाऊ शकतात. मुख्याधिकारी देवरे यांनी नेत्यांचा विरोध पत्करून ही अतिक्रमणे काढल्याने ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत.
देवरे यांच्या या निर्णयामुळे अनेकजण दुखावले गेले तरी त्यांचा निर्णय हा शहराच्या हितासाठी होता हे नाकारून चालणार नाही. आता शहराचा श्वास मोकळा झाला असला, तरी ही अतिक्रमणे पुन्हा होणार नाहीत, यासाठी पालिका प्रशासनाला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.
मुख्याधिकारी मंगेश देवरे म्हणाले, अतिक्रमण काढणे गरजेचे होते. पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी आम्ही पुरेपूर खबरदारी घेणार आहोत. यासाठी एक पथक तयार करणार असून, त्या पथकाकडे ही जबाबदारी सोपवली जाणार आहे.
शहराच्या विकासासाठी अडसर ठरणार्या अतिक्रमण विरोधात पालिका प्रशासनाने खमकी भूमिका घेत कारवाई केली. इतर वेळी पुढे असणारे पालिका पदाधिकारी कारवाई दरम्यान कुठेच दिसले नाहीत, किंबहुना कारवाई मोहिमेकडे फिरकलेच नाहीत.
शहराच्या बाजूची अतिक्रमणे काढली; मात्र आता बाजारपेठेतील अतिक्रमणावर हातोडा कधी पडणार असा सवाल उपस्थित होतो आहे.झेंडा चौकात झालेली अतिक्रमणे काढणे पालिका प्रशासनाला आव्हान असणार आहे.